शिधापत्रिकांचे संगणकीकरण रखडले

By Admin | Updated: March 10, 2016 02:24 IST2016-03-10T02:24:37+5:302016-03-10T02:24:37+5:30

रेशन कार्डमध्ये कोणाताही फेरफार किंवा बोगसगिरीला आळा बसावा, याकरिता डिजिटलायझेशन करण्यात येणार आहे. आगामी काळात सगळ्यांना स्मार्ट रेशन कार्ड देण्याचे शासनाच्या विचाराधीन आहे

Rationalization of rationalization | शिधापत्रिकांचे संगणकीकरण रखडले

शिधापत्रिकांचे संगणकीकरण रखडले

प्रशांत शेडगे,  पनवेल
रेशन कार्डमध्ये कोणाताही फेरफार किंवा बोगसगिरीला आळा बसावा, याकरिता डिजिटलायझेशन करण्यात येणार आहे. आगामी काळात सगळ्यांना स्मार्ट रेशन कार्ड देण्याचे शासनाच्या विचाराधीन आहे. त्यामुळे राज्यात शिधापत्रिका संगणकीकरण करण्याची मोहीम सुरू करण्यात आली आहे. पनवेल तालुक्यातील माहिती जमा करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. त्याकरिता आधार कार्डशी लिंकिंग होणे आवश्यक असून, त्याशिवाय नावाची नोंद होणार नाही. अर्ज त्याचबरोबर आधार कार्डची प्रत देण्याकरिता पनवेलकर पाठ फिरवत आहेत. आजतागायत ५० टक्के कार्डधारकांनी लिंकिंग केले नाही. त्यामुळे भविष्यात शिधापत्रिकाधारक रद्द करण्याचा इशारा शासनाकडून देण्यात आला आहे.
कामांमध्ये त्याचबरोबर प्रशासनात पारदर्शकता यावी, याकरिता शासनाने पेपरलेस कारभारावर भार दिला आहे. त्यात संगणकीकरणावर अधिक भर देण्यात आला आहे. त्यामुळे वेगवेगळ्या विभागांत माहिती आणि तंत्रज्ञानाचा मोठ्या प्रमाणात वापर करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. अन्न व नागरी पुरवठा विभाग सुद्धा हायटेक करण्याचा संकल्प शासनाने केला आहे. त्याचबरोबर वितरण व्यवस्थेतही अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर शासन करीत आहे.
पनवेल तालुका विस्ताराने आणि लोकसंख्येने मोठा असून, या ठिकाणी रेशन कार्डधारकांची संख्या २,०४,६९६ इतकी आहे. त्यामुळे जिल्हाधिकारी व जिल्हा पुरवठा कार्यालयाकडून या तालुक्यावर लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. या संदर्भात प्रांताधिकारी भरत शितोळे, तहसीलदार दीपक आकडे व तालुका पुरवठा अधिकारी शशिकांत वाघमारे यांनी सर्व दुकानदारांची बैठक घेऊन या कामात सहकार्य करण्याचे आवाहन केले. त्याचबरोबर वेगवेगळ्या मार्गांनी नागरिकांना माहिती देण्यात येत आहे. असे असतानाही कार्डधारकांकडून म्हणावा असा प्रतिसाद मिळत नसल्याने संगणकीकरणाच्या कामात अडथळे येत आहेत. शिधापित्रका विविध ठिकाणी रहिवासी पुरावा म्हणून ग्राह्य धरला जातो. शासकीय योजना, शालेय प्रवेशाकरिता हे कार्ड गरजेचे असते. त्यामुळे आपले कार्ड डिजिटल करण्याकरिता अर्ज भरून आधार कार्डची एक छायांकित प्रत संबंधित दुकानदाराकडे द्यावी, असे आवाहन तालुका पुरवठा अधिकारी
शशिकांत वाघमारे यांनी केले आहे. (वार्ताहर)

Web Title: Rationalization of rationalization

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.