सीएएच्या समर्थनार्थ नेरळमध्ये रॅली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 17, 2020 23:40 IST2020-02-17T23:40:02+5:302020-02-17T23:40:31+5:30
नागरिकांचा उत्स्फू र्त सहभाग : नागरिकत्व संशोधन कायद्याबाबत जनजागृती

सीएएच्या समर्थनार्थ नेरळमध्ये रॅली
नेरळ : भारत देशाच्या संसदेत नागरिकत्व संशोधन कायदा हा दोन्ही सभागृहांत पारित झालेला आहे. हा कायदा मुळात भारतातील नागरिकांचे नागरिकत्व याला धक्का न लावता भारतात जे आश्रित, शरणार्थी आहेत त्यांना नागरिकत्व देऊन त्यांचे हक्क त्यांना परत देण्यासाठी आहे, असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रचारक राजेश कुंटे यांनी नेरळ येथे केले. नागरिकत्व संशोधन कायदा सीएएच्या समर्थनार्थ रॅली व सभेचे आयोजन करण्यात आले होते. त्या वेळी कुंटे बोलत होते.
सध्या देशात सीएए, एनआरसी व कॅब या कायद्यांवरून रणकंदन माजले आहे. जनता रस्त्यावर उतरत आहे. यापूर्वी मोठ्या प्रमाणात नेरळमध्ये या कायद्याला विरोध करण्यासाठी रॅली काढण्यात आली होती. तर आता सीएए या कायद्याला समर्थन दर्शविण्यासाठी नागरिक रस्त्यावर उतरले होते. नेरळ येथील मारुती मंदिरापासून या रॅलीची सुरुवात झाली. विसपोर्ट सीएए, वंदे मातरम्, भारतमाता की जय अशा घोषणा देत मोठ्या संख्येने नागरिक या रॅलीत सहभागी झाले होते. तर ‘पढाई करो पत्थरबाजी नही’, ‘जाती का भेद तोडो कॅब के साथ नाता जोडो’, ‘हमे अब्दुल कसाब नही, अब्दुल कलाम चाहिये’, ‘से येस तो सीएए’ अशा प्रकारचे बॅनर सर्वांचे लक्ष वेधून घेत होते. मारुती मंदिरापासून पुढे बाजारपेठ, जयहिंद नाका, तेथून परत छत्रपती शिवाजी महाराज चौकमार्गे जुनी बाजारपेठ करून छत्रपती शिवाजी महाराज मैदान येथे सभा घेण्यात आली. त्या वेळी व्यासपीठावर विनायक चितळे, बजरंग दलाचे महाराष्ट्र सह गोवा प्रांत अध्यक्ष दीपक गायकवाड आदी उपस्थित होते.
या रॅलीत कर्जतचे उपनगराध्यक्ष अशोक ओसवाल, भाजप जिल्हा चिटणीस रमेश मुंढे, भाजप किसान मोर्चा प्रदेश सचिव सुनील गोगटे, भाजप जिल्हा उपाध्यक्ष वसंत भोईर, कोकण धर्म प्रसारक जिल्हा अध्यक्ष साईनाथ श्रीखंडे आदींसह नागरिक सहभागी झाले होते. भाजप कर्जत तालुकाध्यक्ष मंगेश म्हसकर यांच्या पुढाकाराने सीएएच्या समर्थणार्थ रॅली व सभा आयोजित करण्यात आली होती. तालुकाध्यक्ष हा कार्यभार स्वीकारल्यानंतर प्रथमच म्हसकर यांनी त्यांच्या माध्यमातून कार्यक्रमाचे आयोजन केले. अत्यंत शिस्तबद्ध व भव्य स्वरूपाच्या या रॅलीने नागरिकता संशोधन कायदा सीएएचे महत्त्व पटविण्यात महत्त्वाची भूमिका बजावली.