कर्जत नगराध्यक्षपदी रजनी गायकवाड विराजमान
By Admin | Updated: August 10, 2016 03:21 IST2016-08-10T03:21:19+5:302016-08-10T03:21:19+5:30
नगरपरिषदेची सार्वत्रिक निवडणूक जानेवारी २०१४ मध्ये झाली होती. त्यावेळी सतरापैकी दहा जागा मिळवून राष्ट्रवादी काँग्रेसने आपली निर्विवाद सत्ता आणली आणि युतीच्या

कर्जत नगराध्यक्षपदी रजनी गायकवाड विराजमान
कर्जत : नगरपरिषदेची सार्वत्रिक निवडणूक जानेवारी २०१४ मध्ये झाली होती. त्यावेळी सतरापैकी दहा जागा मिळवून राष्ट्रवादी काँग्रेसने आपली निर्विवाद सत्ता आणली आणि युतीच्या उमेदवारांचा पराभव करून नगराध्यक्षपदी राजेश लाड तर उपनगराध्यक्षपदी लालधारी पाल यांची निवड झाली. अडीच वर्षांचा कालावधी संपल्यानंतर आज पुन्हा निवडणूक झाली. त्यामध्ये राष्ट्रवादीच्या रजनी गायकवाड नगराध्यक्षपदी तर अर्चना बैलमारे यांची उपनगराध्यक्षपदी बिनविरोध निवड करण्यात आली. यानिमित्ताने कर्जत नगरपरिषदेमध्ये खऱ्या अर्थाने महिलाराज आले असून कर्जतच्या इतिहासात नगराध्यक्षपदी प्रथमच एक दलित महिला विराजमान झाली आहे.
कर्जतचे उपविभागीय अधिकारी दत्ता भडकवाड यांच्या अध्यक्षतेखाली निवडणुकीच्या विशेष सभेचे आयोजन करण्यात आले होते. या प्रसंगी मावळते नगराध्यक्ष राजेश लाड, मावळत्या नगराध्यक्षा पुष्पा दगडे, रजनी गायकवाड, अर्चना बैलमारे, लालधारी पाल, उमेश गायकवाड, मिलिंद चिखलकर, शीतल लाड, अश्विनी दिघे, सई वारे, नितीन सावंत, संतोष पाटील, सुवर्णा जोशी आदी उपस्थित होते. नगरपरिषदेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस दहा, शिवसेना सहा व भाजपा दोन असे पक्षीय बलाबल आहे. नगराध्यक्षपदासाठी अनुसूचित जातीच्या महिलेचे आरक्षण असल्याने रजनी रामदास गायकवाड या एकमेव उमेदवार असल्याने त्यांनी अर्ज दाखल केला. एकच अर्ज असल्याने त्या बिनविरोध निवडून आल्याचे निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी जाहीर केले. त्यानंतर उपनगराध्यक्षपदासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अर्चना अरु ण बैलमारे यांनी व शिवसेनेतर्फे मुकेश राजाराम पाटील यांचे अर्ज आले होते. मुदतीत कुणीही अर्ज मागे न घेतल्याने मतदान घेण्यात आले. त्यामध्ये अर्चना बैलमारे यांना दहा तर मुकेश पाटील यांना सहा मते मिळाली. त्यामुळे अर्चना बैलमारे उपनगराध्यक्षपदी निवडून आल्याचे जाहीर करण्यात आले.
या प्रसंगी आमदार सुरेश लाड, जिल्हा परिषद अध्यक्ष सुरेश टोकरे, मनसेचे माजी जिल्हाध्यक्ष मनीष खवळे, आरपीआय स्वाभिमानचे जिल्हाध्यक्ष उत्तम जाधव, माजी नगराध्यक्ष शरद लाड आदींसह राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. (वार्ताहर)