पावसाळ्यात वेदर शेडला परवानगी नाहीच

By Admin | Updated: July 15, 2016 01:40 IST2016-07-15T01:40:34+5:302016-07-15T01:40:34+5:30

वेदर शेडची परवानगी घेऊन पक्के शेड बांधणाऱ्यांमुळे शहरात सरसकट मार्जिनल स्पेसचा वापर करणाऱ्यांवर कारवाईला सुरुवात केली आहे.

The rain shed is not allowed during monsoon | पावसाळ्यात वेदर शेडला परवानगी नाहीच

पावसाळ्यात वेदर शेडला परवानगी नाहीच

नवी मुंबई : वेदर शेडची परवानगी घेऊन पक्के शेड बांधणाऱ्यांमुळे शहरात सरसकट मार्जिनल स्पेसचा वापर करणाऱ्यांवर कारवाईला सुरुवात केली आहे. यामुळे भरपावसात व्यावसायिकांच्या मालाचे नुकसान होत असल्यामुळे त्यांना तात्पुरत्या वेदर शेडला परवानगी द्यावी, अशी मागणी लोकप्रतिनिधींनी स्थायी समितीमध्ये केली होती. यावेळी वेदर शेडला परवानगी नाहीच, या भूमिकेवर ठाम राहत आवश्यकता भासल्यास सुधारित प्रस्ताव महासभेपुढे मांडू, अशी भूमिका प्रशासनाने स्पष्ट केली.
पालिकेने सरसरकट वेदर शेडवर सुरू केलेल्या कारवाईबाबत मागील स्थायी समिती बैठकीत नगरसेवक मनोहर मढवी यांनी आवाज उठवला होता. केवळ पावसाळ्याकरिता व्यावसायिकांना वेदर शेडची परवानगी द्यावी अन्यथा त्यांच्या मालाचे नुकसान होईल, असेही त्यांनी सभागृहात सांगितले होते. त्यावेळी प्रशासनाच्या वतीने ठोस आश्वासन देण्यात आलेले नव्हते. त्यामुळे बुधवारी झालेल्या स्थायी समिती बैठकीत मढवी यांनी पुन्हा सभागृहात हा मुद्दा उपस्थित केला. यावेळी अतिरिक्त आयुक्त अंकुश चव्हाण यांनी वेदर शेडला परवानगी नाहीच, असे प्रशासनाचे ठाम मत सांगितले. यापूर्वी ज्या व्यावसायिकांना वेदर शेडची तात्पुरती परवानगी देण्यात आलेली होती त्याचा गैरफायदा घेत अनेकांनी वेदर शेडच्या नावाखाली पक्के बांधकाम करून मार्जिनल स्पेसचा वापर केल्याचे आढळल्याचेही चव्हाण यांनी सांगितले. त्यामुळे आवश्यकता भासल्यास वेदर शेडला परवानी देण्यासंबंधीचा सुधारित प्रस्ताव पुन्हा महासभेपुढे मांडू, असेही त्यांनी सांगितले. या सुधारित प्रस्तावात परवानगीसंबंधीच्या सर्व आवश्यक अटी-शर्तींचा समावेश असेल, असेही त्यांनी सभागृहात सांगितले. परंतु या प्रकाराला विभाग अधिकारीच जबाबदार असल्याचे सांगत नगरसेवक मढवी यांनी प्रशासनाला धारेवर धरले. केवळ पावसाळ्याकरिता वेदर शेडची परवानगी दिल्यानंतर मुदतीनंतर ते काढून घेण्याची जबाबदारी प्रशासनाचीच आहे. यामुळे ज्या ठिकाणी वेदर शेडच्या नावाखाली पक्के बांधकाम झाले असेल, त्या ठिकाणच्या विभाग अधिकाऱ्यांवर देखील कारवाईची मागणी त्यांनी केली. (प्रतिनिधी)

Web Title: The rain shed is not allowed during monsoon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.