माथेरान घाटातील रेलिंग कुचकामी
By Admin | Updated: December 23, 2015 00:38 IST2015-12-23T00:38:17+5:302015-12-23T00:38:17+5:30
माथेरानमधील पर्यटकांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. याठिकाणी येणारे पर्यटक नेरळ -माथेरान घाट रस्त्याचा वापर करतात

माथेरान घाटातील रेलिंग कुचकामी
कर्जत : माथेरानमधील पर्यटकांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. याठिकाणी येणारे पर्यटक नेरळ -माथेरान घाट रस्त्याचा वापर करतात. मात्र या रस्त्यावरील लोखंडी रेलिंग अनेक ठिकाणी तुटले असल्याने अपघात होण्याची स्थिती निर्माण झाली असून आतापर्यंत अनेक वाहने दरीत गेली आहेत.
माथेरान या थंड हवेच्या ठिकाणी जाण्यासाठी दोन मार्ग आहेत. त्यातील सर्वाधिक वापर होणारा मार्ग म्हणून नेरळ-माथेरान घाट रस्ता ओळखला जातो. नेरळपासून दस्तुरी नाका असा घाट रस्ता आठ किलोमीटर लांबीचा असून अनेक ठिकाणी घाट रस्ता अरु ंद आहे.
दुसरी महत्त्वाची बाब म्हणजे या घाट रस्त्यावरील अवघड वळणांमुळे हा घाट रस्ता नवीन वाहन चालकांसाठी धोकादायक समजला जातो. त्याचवेळी या घाट रस्त्याचे वैशिष्ट्य म्हणजे एका बाजूला पूर्णपणे दरीचा भाग असून जरा चूक झाली तरी वाहने रस्त्यातून खाली दरीत जाण्याची भीती असते. त्यामुळे संपूर्ण घाट रस्त्यात दरीकडील भागात काँक्रीटच्या संरक्षण भिंती बांधून पर्यटकांचा प्रवास सुखकर करण्याचा प्रयत्न सार्वजनिक बांधकाम विभागाकडून सुरु आहे. तरी देखील निम्म्याहून अधिक घाट रस्त्यामध्ये संरक्षण भिंती किंवा लोखंडी रेलिंग नाहीत. त्यामुळे हा घाट रस्ता धोकादायक समजला जातो. (वार्ताहर)