शिक्षक भरतीसाठी महानगरपालिका मुख्यालयाबाहेर उमेदवारांच्या रांगा
By नामदेव मोरे | Updated: July 10, 2023 17:13 IST2023-07-10T17:13:09+5:302023-07-10T17:13:23+5:30
१८३ जागांसाठी भरती : दोन हजार पेक्षा जास्त उमेदवारांची उपस्थिती

शिक्षक भरतीसाठी महानगरपालिका मुख्यालयाबाहेर उमेदवारांच्या रांगा
नवी मुंबई : महानगरपालिकेने प्राथमिक व माध्यमीक शिक्षकांच्या १८३ जागा तात्पुरत्या स्वरूपात भरण्यासाठी अर्ज मागविले होते. यासाठी दोन हजार पेक्षा जास्त उमेदवारांनी मनपा मुख्यालयाबाहेर गर्दी केली होती. दिवसभर या उमेदवारांच्या मुलाखती सुरू होत्या.
नवी मुंबई महानगरपालिकेच्या शाळांमध्ये शिक्षकांची कमतरता असल्यामुळे विद्यार्थ्यांचे नुकसान होत आहे. शिक्षकांची रिक्त असलेली पदे भरण्यासाठी महानगरपालिकेने जाहीरात दिली होती. १२३ प्राथमीक शिक्षक व माध्यमीकसाठी ६० शिक्षकांची भरती करण्यासाठी १० जुलैला अर्ज घेऊन मुलाखतीसाठी बोलावण्यात आले होते. मनपा मुख्यालयात सकाळपासूनच इच्छूक उमेदवारांनी गर्दी केली होती. महानगरपालिकेच्या प्रवेशद्वारापासून सीवूडच्या दिशेच्या रेल्वे पूलापर्यंत उमेदवारांची रांग लागली होती. सुदैवाने पाऊस उघडला असल्यामुळे उमेदवारांची गैरसोय झाली नाही.
महानगरपालिकेने मुलाखतीसाठी एकच दिवस ठेवल्यामुळे ही गर्दी झाली होती. तात्पुरत्या स्वरूपात भरती असतानाही एवढी गर्दी पाहून सर्वांनी आश्चर्य व्यक्त केले. मागील काही वर्षामध्ये डीएड, बीएड केलेल्या उमेदवारांना नोकरीच मिळत नाही. यामुळे हजारो तरूणांवर बेकार होण्याची वेळ आली आहे. यामुळेच तरूणांनी महानगरपालिकेने तात्पुरत्या स्वरूपात भरती सुरू करताच मोठ्या संख्येने अर्ज घेऊन उमेदवार मुख्यालयात हजर झाले. मुख्यालयामधील ॲम्फी थिएटरमध्येही मोठ्या संख्येने उमेदवार बसून असल्याचे चित्र पहावयास मिळाले. सायंकाळपर्यंत उमेदवारांच्या मुलाखती सुरूच असल्याची माहिती मनपा प्रशासनाने दिली आहे.