तुर्भेतील डम्पिंग ग्राउंडच्या स्थलांतराचा प्रश्न अखेर मार्गी
By Admin | Updated: March 15, 2017 02:42 IST2017-03-15T02:42:18+5:302017-03-15T02:42:18+5:30
तुर्भे येथील डम्पिंग ग्राउंडच्या स्थलांतराचा प्रश्न निकाली लागला आहे. महसूल व वन विभागाने स्थलांतरित होणाऱ्या डम्पिंगसाठी ३४ एकरची पर्यायी जागा उपलब्ध करून देण्या

तुर्भेतील डम्पिंग ग्राउंडच्या स्थलांतराचा प्रश्न अखेर मार्गी
नवी मुंबई : तुर्भे येथील डम्पिंग ग्राउंडच्या स्थलांतराचा प्रश्न निकाली लागला आहे. महसूल व वन विभागाने स्थलांतरित होणाऱ्या डम्पिंगसाठी ३४ एकरची पर्यायी जागा उपलब्ध करून देण्यास मान्यता दिली आहे. मंगळवारी झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे तुर्भे परिसरातील सुमारे दोन लाख रहिवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे.
शहरात दैनंदिन गोळा होणाऱ्या सुमारे ४00 ट्रक कचऱ्याची तुर्भे येथील डम्पिंग ग्राउंडवर विल्हेवाट लावली जाते. त्यामुळे परिसरातील रहिवाशांना दुर्गंधीचा त्रास सहन करावा लागत आहे. अनेकांना श्वसनाचा त्रास होत आहे. तर दमा, टीबीच्या रुग्णांत वाढ झाली आहे. या डम्पिंगचा त्रास शेजारच्या सिडको वसाहतीतील रहिवाशांनाही जाणवत आहे. यापार्श्वभूमीवर तुर्भे स्टोअर येथील डम्पिंग ग्राउंड अन्यत्र हलवावे, यासाठी तेथील स्थानिक रहिवाशांनी एकता नागरिक विकास संस्थेच्या माध्यमातून लढा उभारला होता. स्थानिक नगरसेवक सुरेश कुलकर्णी यांनी यासंदर्भात वेळोवेळी आक्रमक भूमिका घेतली होती. मध्यंतरीच्या काळात या डम्पिंगच्या विरोधात सर्वपक्षीय नगरसेवकांनी महापालिकेच्या सभागृहात हल्लाबोल केला होता. तर बेलापूरच्या आमदार मंदा म्हात्रे यांनी काही दिवसांपूर्वी स्थानिक लोकप्रतिनिधी महसूल व वनमंत्री चंद्रकांत पाटील यांची भेट घेऊन हा प्रश्न मार्गी लावण्याची मागणी केली होती. मंगळवारी यासंदर्भात पुन्हा एक बैठक झाली. या बैठकीत महसूल व वन विभागाने डम्पिंग ग्राउंडसाठी तुर्भे परिसरात नागरी वसाहतीपासून दूर एकूण ३४ एकर जागा उपलब्ध करून देण्यास मान्य केले आहे. लवकरच या जागेचा ताबा महापालिकेला देण्यात येणार असल्याने तुर्भे स्टोअर येथील जवळास दोन लाख रहिवाशांची दुर्गंधीपासून सुटका होणार आहे.
दरम्यान, डम्पिंग ग्राउंडच्या प्रश्नांवर सकारात्मक प्रयत्न करणाऱ्या बेलापूरच्या आमदार मंदा म्हात्रे यांचे तुर्भे परिसरातील रहिवाशांनी आभार मानले आहेत. एकता नागरिक विकास संघर्ष संस्थेच्या माध्यमातून मंगळवारी त्यांचा जाहीर सत्कार करण्यात आला. यावेळी स्थानिक नगरसेवक सुरेश कुलकर्णी, नगरसेविका राधा कुलकर्णी, संगीता वास्के, भाजपा अध्यक्ष रामचंद्र घरत, भाजपाचे नेते संपत शेवाळे आदीसह रहिवासी मोठ्या संख्येने उपस्थित होते. (प्रतिनिधी)