आरोग्य विभागातील कर्मचारी भरती प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 14, 2020 23:22 IST2020-06-14T23:21:24+5:302020-06-14T23:22:40+5:30
नवी मुंबई पालिका प्रशासनाकडून बगल; राखीव आरक्षणाची मागणी

आरोग्य विभागातील कर्मचारी भरती प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह
नवी मुंबई : पालिकेकडून आरोग्य विभागासाठी होत असलेल्या भरती प्रक्रियेत आरक्षण लागू करण्यात आलेले नाही. त्यामुळे स्थानिकांना डावलून वशिल्याची भरती केली जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे तातडीची बाब म्हणून होत असलेल्या भरती प्रक्रियेच्या पारदर्शकतेवरदेखील प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे.
पालिकेच्या आरोग्य विभागात मोठ्या प्रमाणात तज्ज्ञ व कर्मचाऱ्यांची कमतरता आहे. या जागा भरून काढण्यासाठी प्रशासनाकडून आजवर ठोस प्रयत्न झालेले नाहीत. परंतु कोरोनामुळे आरोग्य विभागातले मनुष्यबळ अपुरे पडत असल्याचे समोर येऊ लागले आहे. त्यामुळे पालिकेकडून कंत्राटी स्वरूपात डॉक्टर, परिचारिका व इतर सहायक कर्मचारी भरती सु्न३ करण्यात आली आहे. त्याद्वारे सुमारे ५०० जणांना पालिकेच्या आरोग्य विभागात नोकरीची संधी मिळणार आहे. परंतु पालिकेत कंत्राटी स्वरूपात भरती झालेल्यांना कायम कामगारांप्रमाणेच वेतन व सुविधा दिल्या जातात. त्यामुळे आरोग्य विभागासाठी होत असलेली भरती प्रक्रिया शासकीय नोकर भरतीच ठरत आहे. असे असतानाही प्रशासनाकडून सदर भरती प्रक्रियेसाठी शासनाचे नियम डावलून आरक्षण वगळले आहे.
रिक्त पदांनुसार प्रत्येक प्रवर्गाला राखीव जागा देणे आवश्यक आहे. असे झाल्यास गरजवंतांना नोकरीची संधी मिळू शकते. परंतु कंत्राटी भरतीच्या नावाखाली प्रशासनाकडून या बाबींना बगल देण्यात आली आहे.
त्यामुळे सामाजिक कार्यकर्ते अभयचंद्र सावंत यांनी सदर भरती प्रक्रियेच्या पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. तसेच प्रत्येक प्रवर्गासाठी आरक्षण निश्चित करून नव्याने प्रक्रिया राबवण्याची मागणी त्यांनी पालिका आयुक्तांकडे केली आहे.
सत्ताधारी, विरोधकांचे मौन
पालिकेच्या आरोग्य विभागात रिक्त असलेल्या जागा भरण्यासाठी लागू करण्यात आलेल्या अटी कायमस्वरूपी भरती प्रक्रियेला लागू होणार आहेत. त्यामुळे पूर्वनियोजित पद्धतीने आरक्षण डावलून वशिल्याच्या भरतीसाठी खटाटोप सुरू असल्याचीही शक्यता अभयचंद्र सावंत यांनी वर्तवली आहे. मात्र मोठ्या प्रमाणात भरती प्रक्रिया होत असतानाही सत्ताधारी व विरोधक यांच्या मौनाबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.