माथेरानची राणी उद्यापासून प्रवाशांच्या दिमतीला
By Admin | Updated: May 31, 2017 06:08 IST2017-05-31T06:08:45+5:302017-05-31T06:08:45+5:30
अनिश्चित काळासाठी ९ मे २0१६ पासून बंद ठेवण्यात आलेली नेरळ-माथेरान मिनीट्रेन १ जूनपासून पुन्हा एकदा पर्यटक प्रवाशांच्या दिमतीत

माथेरानची राणी उद्यापासून प्रवाशांच्या दिमतीला
लोकमत न्यूज नेटवर्क
माथेरान : अनिश्चित काळासाठी ९ मे २0१६ पासून बंद ठेवण्यात आलेली नेरळ-माथेरान मिनीट्रेन १ जूनपासून पुन्हा एकदा पर्यटक प्रवाशांच्या दिमतीत रु जू होत आहे. वर्षभराच्या प्रतीक्षेनंतर मिनीट्रेन पुन्हा सुरू होत असल्याने माथेरानच्या राणीच्या स्वागतासाठी प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे. दुसरीकडे मिनीट्रेनची सेवा सुरू करण्यासाठी आवश्यक असलेला स्टाफ यांना तत्काळ नेरळ लोकोमध्ये रुजू होण्यास सांगण्यात आले आहे. नेरळ-माथेरान ही थेट सेवा आणि माथेरान-अमन लॉज ही शटल सेवा एकाच वेळी सुरू करण्यात येणार असल्याने वर्षभर नजरेआड गेलेल्या मिनीट्रेनच्या स्वागतासाठी भव्य सोहळा करण्याची तयारी नगरपालिकेने सुरू केली आहे.
८ आणि ९ मे २०१६ रोजी माथेरान येथून नेरळसाठी निघालेल्या मिनीट्रेनचे प्रवासी डबे रु ळावरून घसरले होते. एकाच ठिकाणी अपघात झाल्याने, मात्र कोणतीही मनुष्यहानी झाली नसलेल्या या अपघातानंतर नेरळ-माथेरान मिनीट्रेनची सेवा अनिश्चित काळासाठी बंद करण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला होता. दरम्यानच्या काळात रेल्वेकडून १०० वर्षांची परंपरा असलेल्या या २१ किलोमीटर अंतर असलेल्या मिनीट्रेनच्या नॅरोगेज मार्गाची दुरु स्ती मोठ्या प्रमाणात करण्यात आली. प्रवाशांच्या सुरक्षेची काळजी घेण्याचा निर्णय रेल्वेने घेऊन सुरक्षा कठडे, क्र श बॅरिअर, गॅबियन यांची बांधणी करून तर काही ठिकाणी रूळ बदलून नवीन रूळ टाकण्याचे काम करण्यात आले. त्याचवेळी माथेरानमध्ये पडणारा प्रचंड पाऊस हा माती वाहून घेऊन जात असतो. पावसाळ्यात मिनीट्रेनच्या नॅरोगेज रु ळाखालील प्रचंड माती वाहून गेली आहे. त्या ठिकाणी माती टाकण्याचे काम,मागील दोन महिने करण्यात आले.
१५ दिवस मिनीट्रेनची चाचणी
या काळात रेल्वे प्रशासनाने मिनीट्रेनसाठी नवीन दोन इंजिने बांधण्यात आली. त्याचवेळी मिनीट्रेनचे प्रवासी डबे एअर ब्रेक प्रणालीचे करण्यात आले यामुळे मिनीट्रेन वर्षभरानंतर पुन्हा एकदा नॅरोगेज ट्रॅकवर येत आहे. गेली १५ दिवस मिनीट्रेनची चाचणी घेतली जात असून त्यातील काही चाचण्या या रेल्वेचे अनेक वरिष्ठ अधिकारी यांच्या देखरेखीत पूर्ण झाल्या आहेत.
मंगळवार, ३० मे रोजी मध्य रेल्वेचे मुंबई विभागीय महाव्यवस्थापक रवींद्र गोयल यांनी मिनीट्रेनमधून प्रवास केला.
अमन लॉज-माथेरान दरम्यान केलेल्या प्रवासात त्यांच्यासोबत मध्य रेल्वेचे अनेक वरिष्ठ अधिकारी होते. त्यांच्याकडून ट्रॅकवर अपूर्ण असलेली कामे दोन दिवसात पूर्ण करण्याच्या सूचना देण्यात आल्या असून लवकरच मिनीट्रेन सुरू करण्याचे आपले प्रयत्न राहणार असल्याचे त्यांनी माथेरान येथे स्पष्ट केले.