एकाधिकारशाहीला धक्का
By Admin | Updated: May 26, 2016 03:02 IST2016-05-26T03:02:07+5:302016-05-26T03:02:07+5:30
मालमत्ता कर विभागातील प्रशासकीय अनियमिततेचा ठपका ठेवून पालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी करनिर्धारक व संकलक प्रकाश कुलकर्णी यांना तडकाफडकी निलंबित केले आहे.
एकाधिकारशाहीला धक्का
नवी मुंबई : मालमत्ता कर विभागातील प्रशासकीय अनियमिततेचा ठपका ठेवून पालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी करनिर्धारक व संकलक प्रकाश कुलकर्णी यांना तडकाफडकी निलंबित केले आहे. यामुळे ९ वर्षांपासून मालमत्ता कर विभागात सुरू असलेल्या एकाधिकारशाहीला धक्का बसला आहे. कारवाईमुळे पालिका वर्तुळामध्ये खळबळ उडाली असून, एकाच विभागात वर्षानुवर्षे ठाण मांडणाऱ्या चिकटू कर्मचाऱ्यांचे धाबे दणाणले आहे.
महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी पहिल्या दिवसापासून पालिकेच्या प्रशासनातील अनागोंदी संपुष्टात आणण्याचा धडाका सुरू केला आहे. महापालिकेचा कारभार नियमाप्रमाणेच झाला पाहिजे असा स्पष्ट आदेश त्यांनी सर्व विभागप्रमुखांना दिला आहे. प्रत्येक खात्याच्या बैठका घेवून कामकाज कसे असावे याविषयी सूचना दिल्या जात आहेत. महापालिकेच्या उत्पन्नामध्ये मालमत्ता कर विभागाचा महत्त्वाचा वाटा असतो. एलबीटी रद्द झाल्याने मालमत्ताकर हाच प्रमुख स्रोत झाला आहे. परंतु मागील काही वर्षांपासून या विभागात ठरावीक कर्मचारी व अधिकाऱ्यांची मक्तेदारी सुरू झाली होती. २००७ पासून प्रकाश कुलकर्णी यांच्याकडे करनिर्धारक व संकलक हे पद आहे. आयुक्त मुंढे यांनी पदभार स्वीकारण्यापूर्वीच प्रथम लेखा व नंतर मालमत्ता कर विभागाला भेट दिली होती. मालमत्ता कर विभागातील अनागोंदी कारभार त्यांच्या निदर्शनास आला होता.
उद्योजकांकडील थकबाकी वसूल करण्यास दिरंगाई होत असल्याबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली होती. उद्योजकांसाठी नाही पालिकेसाठी काम करा अशा स्पष्ट सूचना दिल्या होत्या. गत तीन आठवड्यात मालमत्ता कर विभागाचा आढावा घेतल्यानंतर कामकाजामध्ये गंभीर प्रशासकीय अनियमितता असल्याचे निदर्शनास आले.
मालमत्तांच्या नोंदी व इतर अनेक गोष्टींमध्ये त्रुटी आढळून आल्याने आयुक्तांनी बुधवारी त्यांना निलंबित करून चौकशीचे आदेश दिले आहेत. त्यांचा पदभार एलबीटी विभागाचे प्रमुख उमेश वाघ यांच्याकडे देण्यात आला आहे.
प्रशासकीय अनियमिततेमुळे प्रथमच प्रमुख अधिकाऱ्यांना निलंबित केले आहे. यामुळे महापालिकेमध्ये खळबळ उडाली आहे. चुकीचे काम करणारे व कामचुकारपणा करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहे. मालमत्ता कर विभागात ठरावीक अधिकारी व कर्मचाऱ्यांची मक्तेदारी सुरू झाली होती. वर्षानुवर्षे ठरावीक कर्मचारीच या विभागात काम करत आहेत. तीन वर्षात बदली होणे आवश्यक असताना प्रत्यक्षात ५ ते १० वर्षे अनेक जण याच विभागात तळ ठोकून आहेत. यामुळे संबंधितांची मनमानी वाढली होती. माहितीच्या अधिकारामध्येही या विभागातील माहिती दिली जात नव्हती. गोपनीय व वैयक्तिक माहिती असल्याचा दावा करून माहिती देणे टाळले जात होते. शहरातील अनेक मालमत्तांना कर आकारणीच केली जात नव्हती. मालमत्तानिहाय कर भरल्याची योग्य नोंदही केली जात नव्हती. आयुक्तांनी केलेल्या कारवाईमुळे इतर विभागातील चिकटू कर्मचाऱ्यांनाही कारवाई होण्याची भीती वाटू लागली आहे. (प्रतिनिधी)
आयुक्तांच्या धाडसी कारवाईचे स्वागत
मालमत्ता कर विभागाच्या प्रमुखावर कारवाई झाल्यामुळे महापालिकेतील चिकटू कर्मचाऱ्यांचे धाबे दणाणले आहे. वास्तविक कोणत्याही अधिकारी व कर्मचाऱ्यांची एका विभागामध्ये मक्तेदारी निर्माण होवू नये यासाठी तीन वर्षांनी बदल्या होणे आवश्यक होते. परंतु मालमत्ता, एलबीटी व इतर अनेक विभागात ५ ते १० वर्षांपासून अनेक कर्मचारी तळ ठोकून आहेत. आयुक्तांच्या कारवाईने सर्वांचे धाबे दणाणले असून शहरवासीयांनी मात्र या धाडसी निर्णयाचे स्वागत केले असून प्रशासनातील साफसफाई मोहीम सुरू ठेवावी अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.
विक्रमी
वसुलीचा दावा
मालमत्ता कर विभागाने २०१५ - १६ या आर्थिक वर्षामध्ये ५१६ कोटी रूपयांची वसुली केली होती. गतवर्षीपेक्षा १०९ कोटी रूपये जास्त वसूल केल्याचा दावा केला होता. या कामगिरीसाठी प्रकाश कुलकर्णी यांचा यापूर्वीच्या आयुक्तांनी सत्कारही केला होता. परंतु वास्तवात मूळ अर्थसंकल्पात दिलेले उद्दिष्ट पूर्ण झालेच नव्हते. सुधारित अर्थसंकल्पात उद्दिष्ट कमी करून नंतर ते पूर्ण झाल्याचे भासविण्यात आले होते. आयुक्तांच्या कारवाईनंतर या विभागातील अनागोंदीवर सर्वांचेच लक्ष केंद्रित झाले आहे.