नवी मुंबई - पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंतीनिमित्त अहिल्यादेवी सामाजिक व शैक्षणिक विकास ट्रस्ट, कराड आणि ऑल इंडिया धनगर समाज महासंघ यांच्या संयुक्त विद्यमाने नवी मुंबईत भव्य पुरस्कार वितरण समारंभ आयोजित करण्यात आला. या सोहळ्यात विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या १४० कर्तृत्ववान महिलांचा सन्मानचिन्ह आणि मानपत्र देऊन गौरव करण्यात आला. या कार्यक्रमाने महिलांच्या सक्षमीकरणाला चालना देत समाजापुढे एक आदर्श निर्माण केला आहे.
अहिल्यादेवींच्या कर्तृत्वाला इतिहासात तोड नाही
माजी आमदार रामहरी रुपनवर यांनी आपल्या भाषणात अहिल्यादेवी होळकर यांच्या कार्याचा गौरव केला. ते म्हणाले की, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या दातृत्व आणि कर्तृत्वाला इतिहासात तोड नाही. त्या मानवता आणि समतेच्या पुरस्कर्त्या होत्या. त्यांचे कार्य केवळ एका समाजापुरतेच मर्यादित नव्हते. छत्रपती शिवाजी महाराजांनंतर तेवढ्याच तोलामोलाचे राज्य करणारी एकमेव अद्वितीय स्त्री म्हणून अहिल्यादेवी होळकर ओळखल्या जातात. त्यांनी देशातील पहिली सैनिकी महिलांची शाळा सुरू केली, ज्यामुळे महिलांना शिक्षण आणि सक्षमीकरणाची संधी मिळाली असं त्यांनी सांगितले.
तर अहिल्यादेवी सामाजिक व शैक्षणिक विकास ट्रस्टने हा उपक्रम राबवून महिलांना प्रेरणा देण्याचा आणि त्यांच्या कर्तृत्वाला व्यासपीठ उपलब्ध करून देण्याचा यशस्वी प्रयत्न केला. ट्रस्टचे अध्यक्ष प्रवीण काकडे यांच्या नेतृत्वाखाली हा भव्य सोहळा आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमातून महिलांना पुढे जाण्यासाठी प्रोत्साहन मिळाले असून, समाजात सकारात्मक बदल घडवण्याची प्रेरणा मिळाली आहे असं प्रवीण काकडे यांनी म्हटलं.
दरम्यान, या सोहळ्याला प्रमुख अतिथी म्हणून मुंबई महानगरपालिकेचे उपायुक्त विश्वास मोटे, क्रुगर व्हेंटिलेशन कंपनीचे जनरल मॅनेजर संपतराव शेडगे, म्हाडाचे वरिष्ठ अधिकारी शंकरराव विरकर आणि ठाणे पोलीस इन्स्पेक्टर सोमनाथ कर्णवर उपस्थित होते. याशिवाय ऑल इंडिया धनगर समाज महासंघाचे राष्ट्रीय सचिव बी. डी. मोटे, गोवा प्रदेशाध्यक्ष मनीष लाबोर, उद्योगपती अशोक मोटे, वनविभागाचे अधिकारी संजय वाघमोडे आणि बँकेचे संचालक बाळासाहेब पुकळे यांनीही आपले विचार मांडले. त्यांनी अहिल्यादेवींच्या कार्याला उजाळा देताना महिलांच्या सक्षमीकरणासाठी अशा उपक्रमांचे महत्त्व अधोरेखित केले.