Protection against encroachments under power lines | विद्युत वाहिन्यांखालील अतिक्रमणांना अभय

विद्युत वाहिन्यांखालील अतिक्रमणांना अभय

नवी मुंबई : अतिउच्च दाबाच्या विद्युत वाहिन्यांखालील जागेचा रहिवासी तसेच व्यावसायिक वापर होत असल्याचे दिसून येत आहे. परिणामी, त्या ठिकाणी वास्तव्य करणाऱ्यांच्या जीविताला धोका निर्माण होत आहे. यानंतरही संबंधित सर्वच प्रशासनांकडून डोळेझाक होत  आहे.

शहराच्या अनेक भागांतून अतिउच्च दाबाची विद्युत वाहिनी गेलेली आहे. या विद्युत वाहिनीपासून नागरिकांच्या जीविताला धोका उद्भवू नये याकरिता जमिनीपासून पुरेशा उंचीवर त्यांची उभारणी करण्यात आलेली आहे. तर त्याखालील जागा कोणत्याही कारणासाठी वापरण्यास मज्जाव करून रिक्त ठेवण्यात आली आहे. यानंतरही अतिउच्च दाबाच्या विद्युत वाहिनीखालील मोकळ्या जागेत झोपडपट्ट्या उभारल्या जात असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. ऐरोली सेक्टर २, सेक्टर २० यासह इतर ठिकाणी विद्युत वाहिनीखालीच झोपड्यांचे साम्राज्य पाहायला मिळत आहे. भूमाफियांनी त्या जागा बळकावून झोपड्यांचे साम्राज्य उभारले असल्याचा आरोप प्रदीप काळे यांनी केला आहे. यामध्ये तिथल्या रहिवाशांवर मृत्यूची टांगती तलवार निर्माण झाली आहे. परंतु संपूर्ण परिस्थिती नजरेसमोर असताना लोकप्रतिनिधी व अधिकारी अर्थपूर्ण डोळेझाक करून गरिबांना मृत्यूच्या दाढेत ढकलत असल्याचा आरोप सर्वसामान्यांकडून होत आहे. यामुळे भविष्यात उच्च दाबाच्या विद्युत वाहिनीखाली एखादी दुर्घटना घडल्यास अधिकारी जबाबदार असतील, असा आरोप प्रदीप काळे यांनी केला आहे.

Web Title: Protection against encroachments under power lines

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.