विरोधी नगरसेवकांचे प्रस्ताव रखडविले
By Admin | Updated: October 1, 2015 23:53 IST2015-10-01T23:53:25+5:302015-10-01T23:53:25+5:30
महापालिकेमध्ये शिवसेना, भाजपा नगरसेवकांच्या प्रभागातील विकासकामे रखडविली जात आहेत. विकासकामांचा शुभारंभ करताना पालकमंत्री, खासदार व आमदारांना डावलले

विरोधी नगरसेवकांचे प्रस्ताव रखडविले
नवी मुंबई : महापालिकेमध्ये शिवसेना, भाजपा नगरसेवकांच्या प्रभागातील विकासकामे रखडविली जात आहेत. विकासकामांचा शुभारंभ करताना पालकमंत्री, खासदार व आमदारांना डावलले जात असल्याविषयी भाजपा आमदार मंदा म्हात्रे यांनी तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली आहे.
शिवसेना व भाजपा नगरसेवकांच्या शिष्टमंडळाने मंदा म्हात्रे यांच्या नेतृत्वाखाली आयुक्त दिनेश वाघमारे यांची भेट घेतली. महापालिका निवडणुका झाल्यापासून शहरातील विकासकामे वेगाने होत नाहीत. विरोधी पक्षातील नगरसेवकांच्या प्रभागातील कामे होत नाहीत. विकासकामे तत्काळ मार्गी लावण्याची मागणी केली. महापालिका शहरातील विकासकामांचे उद्घाटन व भूमिपूजन करताना ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे, खासदार राजन विचारे व आमदार मंदा म्हात्रे यांना डावलत असल्याबद्दल नगरसेवकांनी नाराजी व्यक्त केली. कार्यक्रम पत्रिकेवर माजी खासदार व माजी पालकमंत्र्यांची नावे अगोदर टाकली जात असून निवडून आलेल्या लोकप्रतिनिधींचे नाव खाली टाकले जात आहे. आम्हाला प्रसिद्धी नको आहे. परंतु पूर्वी राजशिष्टाचाराचे कारण सांगून विधान परिषद सदस्य असल्याचे सांगून कार्यक्रमांचे आमंत्रण दिले जात नव्हते. दिवाळे गावच्या जेट्टीच्या पाटीवर नाव नसल्यामुळेही तत्कालीन आमदार व मंत्र्यांनी आक्षेप घेतले होते. मग ते आता राजशिष्टाचार का पाळत नाहीत, असा प्रश्न आयुक्तांसमोर उपस्थित करण्यात आला.
आमदार म्हात्रे यांनी पालिकेच्या कामकाजावर तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली. पालिकेच्या कामांची चौकशी करण्याची मागणी मुख्यमंत्र्यांकडे करणार आहे. विधानसभेत हक्कभंग दाखल केला जाणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. विरोधी पक्षनेते विजय चौगुले यांनीही विकासकामे होत नसल्याबद्दल नाराजी व्यक्त केली. यावेळी नगरसेवक मनोज हळदणकर, एम. के. मढवी, संजू वाडे, माजी विरोधी पक्षनेत्या सरोज पाटील, काशिनाथ पवार, शहर प्रमुख विजय माने, संपत शेवाळे व इतर पदाधिकारी उपस्थित होते. (प्रतिनिधी)