वाहतूक नियम मोडण्यात विद्यार्थ्यांचे प्रमाण मोठे
By Admin | Updated: November 2, 2015 01:48 IST2015-11-02T01:48:21+5:302015-11-02T01:48:21+5:30
तरुणांना वाहतुकीच्या नियमांची शिस्त लागावी यासाठी वाहतूक पोलिसांतर्फे पाच दिवसांची विशेष मोहीम राबवण्यात आली.

वाहतूक नियम मोडण्यात विद्यार्थ्यांचे प्रमाण मोठे
नवी मुंबई : तरुणांना वाहतुकीच्या नियमांची शिस्त लागावी यासाठी वाहतूक पोलिसांतर्फे पाच दिवसांची विशेष मोहीम राबवण्यात आली. शाळा व महाविद्यालय आवारात राबवलेल्या या मोहिमेत वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या ८५३ विद्यार्थ्यांवर कारवाई झाली आहे. त्यामध्ये हेल्मेट न वापरणाऱ्यांची सर्वाधिक संख्या आहे.
भरधाव वेगात वाहन चालवत स्टंट करण्याची तरुणांमधली मानसिकता वाढत चालली आहे. त्यांच्या या जीवघेण्या प्रकारामुळे रस्ते अपघातात जखमी अथवा मृत होणाऱ्यांमध्ये तरुणांची संख्या सर्वाधिक आहे. यामुळे तरुणांना वाहतुकीच्या नियमांची शिस्त लागावी यासाठी वाहतूक पोलिसांच्या वतीने पाच दिवसांची कारवाईची विशेष मोहीम राबवण्यात आली. वाहतूक पोलिसांच्या वतीने राबवलेल्या गेलेल्या या मोहिमेंतर्गत चार पथकांनी परिमंडळ १ व २ मधील विविध शाळा व महाविद्यालयांबाहेर ही मोहीम झाली. त्यामध्ये एकूण ८५३ विद्यार्थ्यांवर कारवाई झाल्याचे वाहतूक पोलीस उपायुक्त अरविंद साळवे यांनी सांगितले. त्यामध्ये हेल्मेट न वापरल्याप्रकरणी तब्बल ७३४ विद्यार्थ्यांवर कारवाई झालेली आहे. अनेकदा मुलगा शाळेत असतानाच किंवा कॉलेजची पायरी चढला की पालकांकडून त्याचे हट्ट पुरवले जातात. त्यामध्ये मोटारसायकल हा तरुणांचा सर्वाधिक हट्ट पालक सहज पूर्ण करतात. मात्र मोटारसायकल घेऊन कॉलेजला जाताना त्यांच्याकडून वाहतुकीच्या नियमांचे पालन होतेय का, याची कसलीही चौकशी ते करीत नाहीत.
यामुळे भरधाव वेगात वाहन चालवण्याच्या प्रयत्नात तरुणांचे अपघात होत आहेत. तर अपघात झाल्यानंतरही केवळ हेल्मेट नसल्यामुळे गंभीर जखमी अथवा मृत होण्याचे प्रमाण अधिक आहे. त्यामुळे तरुणांमध्ये वाहतुकीच्या नियमांसोबतच हेल्मेटच्या वापराच्या महत्त्वाबाबत जागृती होणे गरजेचे असल्याचे साळवे यांनी सांगितले. याकरिताच नवी मुंबई, उरण, पनवेल परिसरातील शाळा-महाविद्यालय परिसरात कारवाईची मोहीम राबवण्यात आली. कामोठे पोलीस ठाण्याच्या परिसरातच आजही अनेक अवैध टपऱ्या उभ्या आहेत.
(प्रतिनिधी)