आयुक्तांच्या निषेधार्थ प्रकल्पग्रस्तांचे आंदोलन
By Admin | Updated: July 16, 2016 02:07 IST2016-07-16T02:07:35+5:302016-07-16T02:07:35+5:30
प्रकल्पग्रस्तांनी गरजेपोटी बांधलेल्या घरांवर पालिकेने कारवाई सुरू केली आहे. या कारवाईविरोधात नागरिकांमध्ये तीव्र असंतोष निर्माण झाला आहे

आयुक्तांच्या निषेधार्थ प्रकल्पग्रस्तांचे आंदोलन
नवी मुंबई : प्रकल्पग्रस्तांनी गरजेपोटी बांधलेल्या घरांवर पालिकेने कारवाई सुरू केली आहे. या कारवाईविरोधात नागरिकांमध्ये तीव्र असंतोष निर्माण झाला आहे. आयुक्त व अतिक्रमणविरोधी कारवाईच्या निषेधार्थ १८ जुलैला नवी मुंबई बंद करण्याचा इशारा दिला आहे.
तुर्भेमध्ये प्रकल्पग्रस्तांच्या बांधकामावर कारवाई करण्यासाठी गेलेल्या पालिकेच्या पथकाला ग्रामस्थांनी तीव्र विरोध केला होता. यानंतरही कारवाई सुरूच ठेवण्याचा निर्णय महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी घेतल्यामुळे प्रकल्पग्रस्तांमध्ये तीव्र असंतोष निर्माण झाला आहे. प्रकल्पग्रस्त पदाधिकाऱ्यांनी शुक्रवारी सकाळी आमदार मंदा म्हात्रे यांच्या घरी बैठकीचे आयोजन केले होते. यानंतर सायंकाळी सानपाडा दत्तमंदिरमध्ये निषेध सभा घेण्यात आली. या सभेला शहरातील सर्वपक्षीय प्रकल्पग्रस्त नेते उपस्थित होते. मंदा म्हात्रे यांनी आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या धोरणांवर सडकून टीका केली. प्रकल्पग्रस्तांच्या घरांवरील कारवाई थांबवा या मागणीसाठी आम्ही आयुक्तांना भेटण्यासाठी गेलो होतो. गरजेपोटी बांधलेल्या घरांवर कारवाई न करण्याचे आवाहन त्यांना केले. परंतु त्यांनी कारवाई होणारच अशी ठाम भूमिका घेतली. या मनमानी कारभाराचा निषेध करण्यासाठी सोमवारी नवी मुंबई बंद करण्याचा इशारा त्यांनी दिला.
माजी सिडको संचालक नामदेव भगत यांनी प्रकल्पग्रस्तांच्या घरांवरील कारवाईचा तीव्र निषेध केला. अतिक्रमण विभागाच्या कारवाईविरोधात तीव्र आंदोलन उभे केले जाईल, एकही घर पाडू दिले जाणार नाही, यासाठी केसेस अंगावर घेण्यासही तयार असल्याचा इशारा त्यांनी दिला. भाजपा जिल्हा अध्यक्ष रामचंद्र घरत यांनी आम्ही शांततेच्या मार्गाने आयुक्तांना समजावून सांगितले परंतु ते मानत नसल्याने आता आंदोलन करण्याशिवाय दुसरा पर्याय नसल्याचे स्पष्ट केले. काँगे्रसचे जिल्हा अध्यक्ष दशरथ भगत यांनीही आम्ही प्रकल्पग्रस्तांच्या हक्कांसाठी व घरांसाठी रोडवर उतरण्यास तयार आहोत. मुंढे यांची मनमानी चालू दिली जाणार नसल्याचा इशाराही त्यांनी दिला. राष्ट्रवादी काँगे्रसचे जिल्हा अध्यक्ष अनंत सुतार यांनी सर्वांनी एकत्र येवून आंदोलन करण्याची गरज असल्याचे यावेळी स्पष्ट करून पालिकेच्या कारवाईचा निषेध केला.