जेएनपीटीतील निदर्शनाच्या निर्णयावर प्रकल्पग्रस्त ठाम
By Admin | Updated: October 10, 2015 00:27 IST2015-10-10T00:27:37+5:302015-10-10T00:27:37+5:30
जेएनपीटीच्या चौथ्या बंदराच्या पायाभरणी समारंभासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वागताची एकीकडे भाजपाच्या रामशेठ ठाकूर, महेश बालदी यांनी जोरदार तयारी चालविली असतानाच दुसरीकडे

जेएनपीटीतील निदर्शनाच्या निर्णयावर प्रकल्पग्रस्त ठाम
उरण : जेएनपीटीच्या चौथ्या बंदराच्या पायाभरणी समारंभासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वागताची एकीकडे भाजपाच्या रामशेठ ठाकूर, महेश बालदी यांनी जोरदार तयारी चालविली असतानाच दुसरीकडे जेएनपीटी प्रकल्पग्रस्तांची साडेबारा टक्के भूखंड वाटपाबाबत केंद्राने चालवलेल्या फसवणूक प्रकरणाचा ठपका ठेवीत मोदींचा निषेध, निदर्शने आणि काळे झेंडे दाखविण्याचा कार्यक्रम उरण तालुका संघर्ष समितीने शुक्रवारी पत्रकार परिषद घेवून जाहीर केला आहे. ११ आॅक्टोबर रोजी करळफाटा येथे जाहीर केलेल्या निषेधाच्या कार्यक्रमप्रसंगी वेळ पडल्यास अनोख्या पद्धतीने आंदोलन करण्याची तयारी चालविल्याने मोदींच्या कार्यक्रमालाच गालबोट लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
गेल्या ३१ वर्षांत साडेबारा टक्के भूखंड वाटपाचा प्रश्न मार्गी लागला नाही. केंद्रात मागील वर्षी स्थानापन्न झालेल्या मोदी सरकारने जेएनपीटी साडेबारा टक्के भूखंड वाटपाचा प्रश्न सहा महिन्यात निकाली काढण्याचे आश्वासन दिले होते. मात्र अद्याप पूर्तता न झाल्याने, शेतकऱ्यांमध्ये केंद्र, राज्य आणि जेएनपीटीविरोधात तीव्र असंतोष आहे. वारंवार आश्वासने देवून भूखंड न मिळाल्याने केंद्र, राज्य आणि जेएनपीटीविरोधातील संघर्ष अगदी शिगेला पोहोचला आहे. त्यामुळेच ११ आॅक्टोबर रोजी चौथ्या बंदराच्या पायाभरणीसाठी येणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यक्रमाचा निषेध नोंदवत निदर्शने आणि काळे झेंडे दाखविण्याचा निर्णय शुक्रवारी झालेल्या पत्रकार परिषदेत सर्वपक्षीय संघर्ष समितीने घेतला आहे.
पोलीस प्रशासनाने आंदोलनकर्त्यांवर दबाव आणण्याचा प्रयत्न केल्यास अथवा अटकसत्र सुरू केल्यास आंदोलन आणखी उग्र करण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला आहे. पत्रकार परिषदेस सर्वपक्षीय समितीचे अध्यक्ष आमदार मनोहर भोईर, दिनेश पाटील, आदी उपस्थित होते. (वार्ताहर)
न्यायहक्कासाठी भाजपा कटिबध्द - रामशेठ ठाकूर
जेएनपीटी प्रकल्पग्रस्तांचा १२.५ टक्केचा प्रश्न गेल्या ३१ वर्षांपासून प्रलंबित आहे. त्यामुळे प्रकल्पग्रस्तांच्या मनात प्रचंड असंतोष असून वर्षानुवर्षे भिजत पडलेला हा प्रश्न मार्गी लावण्यासाठी भाजपा कटिबध्द असून येत्या ३ महिन्यात १२.५ टक्के प्रश्न सुटणार असल्याची ग्वाही माजी खासदार रामशेठ ठाकूर यांनी शुक्रवारी नवघर येथील पत्रकार परिषदेत दिली. जेएनपीटीच्या चौथ्या बंदराच्या भूमिपूजनाला पंतप्रधान नरेंद्र मोदी येणार आहेत. त्यासाठी त्यांना काळे झेंडे किंवा विरोध न करता सर्वांनी विकासाच्या मुद्यावर एकत्र यावे असे आवाहन रामशेठ यांनी यावेळी केले. यावेळी आमदार प्रशांत ठाकूर, रविशेठ भोईर आदी उपस्थित होते.