हातपाटी वाळू व्यावसायिकांचा मोर्चा
By Admin | Updated: March 9, 2016 03:20 IST2016-03-09T03:20:37+5:302016-03-09T03:20:37+5:30
समुद्राच्या चारही दिशांच्या खाड्यांच्या विळख्यातील पेणचं दादर गाव १९८९ च्या पुरात उद्ध्वस्त झालं. गेली २६ वर्षे या गावातील २,५०० एकर भातशेती खाऱ्या पाण्याने बुडून नापीक झाल्यामुळे ग्रामस्थ

हातपाटी वाळू व्यावसायिकांचा मोर्चा
पेण : समुद्राच्या चारही दिशांच्या खाड्यांच्या विळख्यातील पेणचं दादर गाव १९८९ च्या पुरात उद्ध्वस्त झालं. गेली २६ वर्षे या गावातील २,५०० एकर भातशेती खाऱ्या पाण्याने बुडून नापीक झाल्यामुळे ग्रामस्थ समुद्रखाड्यात डुबकी मारून वाळूउपसा करण्याचा परंपरागत व्यवसाय करतात. मात्र मागच्या १५ दिवसांपूर्वी येथील काळभैरव हातपाटी वाळूउपसा करणाऱ्या संघटनेची २०० ब्रास वाळू पेण तहसीलदारांनी कारवाई करून जप्त केल्याच्या निषेर्धात मंगळवारी जागतिक महिला दिनीच दादरच्या महिला व ग्रामस्थ मंडळींनी पेण शहरात मोर्चाद्वारे भीख मांगो आंदोलन छेडीत पेण तहसीलदार कार्यालयावर धडक दिली. या मोर्चाचे नेतृत्व शेकाप आ. धैर्यशील पाटील यांनी केले. काँग्रेस, राष्ट्रवादी, भाजपाच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी मोर्चात सहभागी होत दादर ग्रामस्थांना भक्कम पाठिंबा दिला.
२०१२ मध्ये या हातपाटी वाळू व्यावसायिकांना पेणचे आ. धैर्यशील पाटील यांनी विधिमंडळात या प्रश्नावर आवाज उठवून शासन दरबारी मशिन मिळवून दिले. पारंपरिक व्यवसाय व उत्पन्नाचे दुसरे साधन नसताना रॉयल्टी भरून हे लोक व्यवसाय करीत होते. मात्र रॉयल्टी संपल्यानंतर अधिकृत परवानगीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयात अर्ज केला, मात्र ती प्रक्रिया संबंधित कार्यालयाकडून घेताना विलंब लागतो. अशा वेळेस पेण महसूल प्रशासनाने धाड टाकून दादर खाडी बंदरावरील २०० ब्रास वाळू जप्त केली होती. दुसऱ्या बाजूने सक्शन पंपाद्वारे वाळूउपसा करणाऱ्यांवर दादर सागरी पोलीस ठाण्याचे निरीक्षक दिलीप शिंदे कारवाई न करता सक्शन पंपधारक रेती व्यावसायिकांना अभय दिले. ज्या वेळेस सक्शन पंप ताब्यात घेण्याची प्रांत अधिकारी निधी चौधरी यांनी आदेश दिले असताना महसूल मंडळ अधिकारी, तलाठी, दादर सागरी पोलीस यंत्रणा दादर खाडीत गेली असता, या सक्शन पंपधारकांनी या शासकीय यंत्रणेवर व हातपाटी व्यावसायिकांवर दगडफेक केली. त्यावेळी पोलीस निरीक्षक शिंदे यांनी कारवाई का केली नाही, असा मोर्चेकऱ्यांचा प्रश्न होता. मोर्चेकऱ्यांना भेटावयास आलेल्या पेण तहसीलदार वंदना मकू यांना आ. धैर्यशील पाटील यांनी चांगलेच धारेवर धरले. (वार्ताहर)