कामोठेतील प्रक्रिया केलेले पाणी खाडीत

By Admin | Updated: March 18, 2016 00:17 IST2016-03-18T00:17:39+5:302016-03-18T00:17:39+5:30

सिडकोच्या नियोजनाअभावी कामोठे वसाहतीला भीषण पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. यावर उपाय म्हणून प्रक्रिया झालेल्या पाण्याचा वापर होणे गरजेचे आहे

Processed water bay | कामोठेतील प्रक्रिया केलेले पाणी खाडीत

कामोठेतील प्रक्रिया केलेले पाणी खाडीत

- अरुणकुमार मेहत्रे, कळंबोली

सिडकोच्या नियोजनाअभावी कामोठे वसाहतीला भीषण पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. यावर उपाय म्हणून प्रक्रिया झालेल्या पाण्याचा वापर होणे गरजेचे आहे. मात्र प्रक्रिया केलेल्या पाण्याचा पुनर्वापर करण्याची सुविधाच प्राधिकरणाकडे नाही, म्हणून वीस एमएलडी पाणी खाडीत जात आहे.
कामोठे वसाहतीत ३६ सेक्टर विकसित झाले आहेत. वसाहतीची लोकसंख्या जवळपास दोन लाखांच्या घरात असून त्यासाठी ४० एमएलडी पाण्याची गरज आहे, मात्र २५ एमएलडी पाणी सुध्दा वसाहतीत येत नाही. सिडकोने इतक्या वर्षात कामोठेकरिता स्वयंपूर्ण पाणीपुरवठा योजना केलीच नाही. नवी मुंबई महापालिकेने मोठ्या प्रमाणात कपात केली असल्याने कामोठेकरांना तीव्र पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. वसाहतीत अनेक ठिकाणी पाणीटंचाईवर मात करण्याकरिता बोअरवेल घेण्यात आले मात्र तरीही टंचाई दूर झालेली नाही.
कामोठेत सांडपाण्यावर प्रक्रि या करण्याकरिता सेक्टर ३२ येथे ८५ एमएलडी क्षमतेचे मलनि:सारण केंद्र उभारण्यात आले आहे. नवीन पनवेल आणि कामोठे नोडकरिता ६० कोटी खर्चून अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून हे केंद्र कार्यान्वित करण्यात आले आहे. कामोठे वसाहतीतील सांडपाण्यावर या केंद्रात प्रक्रिया केली जाते. जवळपास वीस एमएलडी पाणी प्रक्रि या होवून बाहेर पडते. हे पाणी बाजूला असलेल्या खाडीत सोडले जात असल्याने त्याचा फायदा सिडकोला होत नाही.

मलनि:सारण केंद्रात आम्ही सांडपाण्यावर प्रक्रि या करून ते पाणी खाडीत सोडून देतो. याचे कारण म्हणजे आमच्याकडे ते पाणी वापरण्याची सुविधा नाही.
- बी.बी. फडतरे,
सहाय्यक कार्यकारी अभियंता
सिडको, कामोठे

मलनि:सारण केंद्रात शास्त्रयुक्त पध्दतीने प्रक्रि या न करता पाणी खाडीत सोडले जात असल्याने या परिसरात मोठ्या प्रमाणात दुर्गंधी पसरते. त्याचबरोबर हे पाणी वाया सुध्दा जात आहे. याबाबत सिडकोने उपाययोजना करणे आवश्यक आहे.
- मिजद पावस्कर,
पटेल पॅलेस, कामोठे

आमच्याकडे मोठी पाणीटंचाई आहे. पिण्यापुरते सुध्दा पाणी येत नाही. सिडकोकडून कोणत्याही उपाययोजना केल्या नसल्याचा हा परिपाक आहे. त्याचबरोबर सिडको सांडपाण्यावर प्रक्रि या न करताच ते पाणी खाडीत सोडून देते.
- इंदू भोसले, कामोठे

Web Title: Processed water bay

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.