एनएमएमटीचे खाजगीकरण

By Admin | Updated: February 20, 2016 02:11 IST2016-02-20T02:11:02+5:302016-02-20T02:11:02+5:30

एनएमएमटीच्या खाजगीकरणाला हिरवा कंदील मिळाला असून सात वर्षांच्या करारावर ठेकेदाराची नियुक्ती करण्यात आली आहे.

Privatization of NMMT | एनएमएमटीचे खाजगीकरण

एनएमएमटीचे खाजगीकरण

सूर्यकांत वाघमारे, नवी मुंबई
एनएमएमटीच्या खाजगीकरणाला हिरवा कंदील मिळाला असून सात वर्षांच्या करारावर ठेकेदाराची नियुक्ती करण्यात आली आहे. होणारा तोटा भरुन काढण्याच्या तसेच दर्जात सुधार आणण्याच्या दृष्टीने परिवहनकडून हा प्रयत्न होत असला तरी त्यात कितपत यश मिळेल हे येणारा काळच स्पष्ट करणार आहे.
सन २०१४ मध्ये महासभेने दिलेल्या प्रशासकीय मंजुरीनुसार परिवहनच्या गाड्या खाजगी ठेकेदारामार्फत चालवल्या जाणार आहेत. याकरिता नोव्हेंबर २०१५ मध्ये ठेकेदारांकडून निविदा मागवण्यात आल्या होत्या. त्यामध्ये जे.एल.एल. या विदेशी कंपनीसह महालक्ष्मी ट्रॅव्हल्स व अ‍ॅन्थोनी यांच्या निविदा प्राप्त झालेल्या. त्यापैकी महालक्ष्मी ट्रॅव्हल्सची निविदा सर्वाधिक कमी दराची असल्याने त्यास मंजुरी मिळाली आहे. यानुसार सात वर्षांच्या कालावधीसाठी त्यांची निवड करण्यात आली असून यासंबंधीचा करार महिन्याभरात होणार आहे. तर फेब्रुवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यात परिवहनच्या झालेल्या बैठकीत प्रस्तावाला मंजुरी देखील मिळाली आहे.
जेएनएनयूआरएम कडून परिवहनला मिळणाऱ्या १४५ व इतर ४० अशा १८५ गाड्यांचे खाजगीकरण होणार आहे. या गाड्यांच्या खरेदीसाठी परिवहनला केंद्राकडे भरावा लागणारा ३० टक्के निधी ठेकेदाराकडून घेतला जाणार आहे. यानुसार गाड्यांचा देखभाल खर्च, इंधन खर्च व चालक ठेकेदाराचा असणार आहे. तर वाहक व कलेक्शनचे अधिकार परिवहनकडेच राहणार आहेत. परिवहनकडून ठेकेदाराला प्रति किलोमीटरप्रमाणे रक्कम दिली जाणार आहे. त्यासाठी वोल्व्हो बससाठी ५८ रुपये, साध्या बससाठी ४१ रुपये तर मिडी बससाठी ३१ रुपये दर निश्चित करण्यात आले आहेत. सद्यस्थितीत परिवहनला सरासरी ६० ते ७१ रुपये प्रति किलोमीटर खर्च येतो. करारनामा झाल्यानंतर १५ मार्चपासून या बसेस मार्गावर सुरु करण्याचाही प्रशासनाचा प्रयत्न आहे. केंद्राच्या निर्देशानुसार भोपाळ, इंदोर व ठाणेपाठोपाठ नवी मुंबई महापालिकेच्या परिवहन उपक्रमाने असा निर्णय झालेला आहे. सदर ठेकेदाराला परिवहनचा एक डेपो भाडेतत्त्वावर दिला जाणार आहे. त्याच ठिकाणी त्याच्या गाड्या उभ्या राहणार असून याचे संपूर्ण नियंत्रण हे परिवहनकडेच असणार आहे.
> केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार खाजगीकरणाचा निर्णय घेण्यात आला आहे. गाड्यांसाठी मनपाला केंद्राकडे भरावा लागणारा ३० टक्के निधी देखील ठेकेदारच भरणार आहे. खाजगीकरणामुळे एनएमएमटीच्या गाड्यांचा दर्जा सुधारणार आहे. शिवाय आजतागायत तोट्यात चाललेल्या परिवहनलाही नफा होणार आहे.
- शिरीष आरदवाड, परिवहन व्यवस्थापक

Web Title: Privatization of NMMT

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.