नारळाला अवघा ७ रुपये भाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 3, 2015 02:49 IST2015-09-03T02:49:25+5:302015-09-03T02:49:25+5:30
नारळासाठी प्रसिद्ध असणाऱ्या पालघर तालुक्यातील बोर्डी परिसरामध्ये सण, उत्सवांच्या पार्श्वभूमीवर व्यापाऱ्यांनी ठाण मांडले असले तरी त्यांच्याकडून नगाला अवघे सात रुपये हा भाव मिळत

नारळाला अवघा ७ रुपये भाव
बोर्डी : नारळासाठी प्रसिद्ध असणाऱ्या पालघर तालुक्यातील बोर्डी परिसरामध्ये सण, उत्सवांच्या पार्श्वभूमीवर व्यापाऱ्यांनी ठाण मांडले असले तरी त्यांच्याकडून नगाला अवघे सात रुपये हा भाव मिळत असल्याने येथील शेतकरी नाडला जात आहे. मुंबई बाजारात यापुढे नारळाला प्रचंड मागणी वाढणार असून येथे नगाला २५ ते ३० रुपये इतक्या चढ्या भावाने किरकोळ विक्री होते. त्यातच या हंगामात नारळावर रोगांचा मोठा प्रादुर्भाव झाल्याने पिक घटले असल्याने अधिक भाव मिळावा अशी बागायतदारांची अपेक्षा आहे.
बोर्डी परिसरातील नरपड, चिखले, घोलवड, बोर्डी, झाई, बोरीगाव, चिंबावे, रामपूर, कोसबाड या गावांत नारळाचे विक्रमी उत्पादन घेतले जाते. फळाचा मोठा आकार, पाण्याची गोड चव, आतील मलई अथवा गर यात बोर्डी परिसरातील नारळ सरस असल्याने त्याला प्राधान्य देत असल्याचे व्यापारी सांगतात. तसेच या फळाला बाजारात मोठी मागणी आहे. मात्र, यंदाच्या मोसमात वाढती महागाई, मजुरी व खताचे वाढते दर यामुळे येथील शेतकरी कर्जबाजारी झाले आहेत. काही वर्षांपासून ऐरियो, ऐरियोफाइड माइट (अष्टपाद कोळी) या रोगांचा प्रादुर्भाव वाढल्याने उत्पादन घटल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. (वार्ताहर)