ऑनलाइन परीक्षेपासून विद्यार्थ्यांना अडवले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 6, 2020 23:47 IST2020-10-06T23:47:37+5:302020-10-06T23:47:44+5:30
मनसेने धरले व्यवस्थापनाला धारेवर

ऑनलाइन परीक्षेपासून विद्यार्थ्यांना अडवले
नवी मुंबई : शुल्क न भरणाऱ्या विद्यार्थ्यांना आॅनलाइन परीक्षेपासून डावलले जात आहे. अशाच शाळेबद्दल मनसेकडे तक्रार प्राप्त झाली होती. यानुसार, मनसेच्या शिष्टमंडळाने नेरूळच्या पोद्दार शाळा व्यवस्थापनाला धारेवर धरून डावललेल्या विद्यार्थ्यांना आॅनलाइन परीक्षेची लिंक खुली केली.
लॉकडाऊनमुळे आॅनलाइन शिक्षण सुरू आहे. यादरम्यान, पालकांवर आर्थिक संकट असल्याने त्यांना शुल्क भरण्यासाठी सक्ती करू नये, असे शासनाचे निर्देश आहेत. यानंतरही अनेक शिक्षण संस्था पालकांकडे शुल्क आकारणीसाठी तगादा लावत आहेत. त्याचप्रमाणे, शुल्क न भरणाºया विद्यार्थ्यांना आॅनलाइन शिक्षण, तसेच परीक्षेत डावलले जात आहे. अशीच तक्रार नेरुळच्या पोद्दार शाळेच्या पालकांनी मनसेच्या विद्यार्थी सेनेकडे केली होती. शुल्क न भरलेल्या विद्यार्थ्यांची परीक्षेची लिंक ब्लॉक करण्यात आली होती. त्यावरून मनविसेचे शहर अध्यक्ष सविनय म्हात्रे यांनी शिक्षण अधिकाऱ्यांकडे तक्रार केली होती, परंतु पालिकेच्या शिक्षण अधिकाºयांनाही न जुमानता, मंगळवारी शाळा व्यवस्थापनाने पुन्हा त्या विद्यार्थ्यांना परीक्षा देऊ दिली नाही.
त्यामुळे संतप्त मनविसेच्या शिष्टमंडळाने शाळेवर धडक देत प्रशासनाला धारेवर धरले. यावेळी मनविसे शहर अध्यक्ष सविनय म्हात्रे, अमोल आयवले, समृद्ध भोपी, अप्पासाहेब जाधव, भरत पासलकर, अखिल खरात, नरेश कुंभार, प्रद्युमन हेगडे आदी उपस्थित होते. त्यानंतर, पुन्हा आॅनलाइन परीक्षेची लिंक सुरू करण्यात आली. मात्र, यानंतर पुन्हा विद्यार्थ्यांची परीक्षा थांबवल्यास शाळेविरोधात तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला.