प्रेमीयुगुलाची आत्महत्या
By Admin | Updated: February 28, 2015 23:01 IST2015-02-28T23:01:01+5:302015-02-28T23:01:01+5:30
प्रेम प्रकरणाला व विवाहाला विरोध असल्यामुळे प्रेमीयुगुलाने कसारा घाटात गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे निष्पन्न झाले.

प्रेमीयुगुलाची आत्महत्या
पोलिसांना घाबरले : घरातून विरोध
कसारा : प्रेम प्रकरणाला व विवाहाला विरोध असल्यामुळे प्रेमीयुगुलाने कसारा घाटात गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे निष्पन्न झाले. जेल रोड येथे राहणारा व पेट्रोलपंपावर नोकरी करून शिक्षण घेणारा संतोष अनिल गाजरे (२१) याचे प्रियंका शंकर काळे (१७) हिच्यासोबत प्रेम होते. ती अल्पवयीन असल्याने व शिक्षण घेत असल्याने आपल्या प्रेम प्रकरणात बाधा येऊ शकते, याची कल्पना दोघांनाही होती.
त्यांची परिस्थिती सामान्य होती. तुमचे शिक्षण पूर्ण करा, चांगल्या कामाधंद्याला लागा व त्यानंतर आपण पुढचा निर्णय घेऊ, असा सल्ला दोघांच्या घरच्यांनी दोघांना दिला. परंतु, आपण स्वतंत्र विचाराचे आहोत, अशी विचारसरणी मनात ठेऊन दोघांनीही २०फेब्रुवारीला घरातून पळ काढला. मुलीचा थांगपत्ता लागत नसल्याने काळे कुटुंबीयांनी नाशिक पोलीस ठाण्यात मिसिंग तक्रार दाखल केली. त्यानंतर, नाशिक पोलिसांकडून संतोषच्या मित्राची विचारपूस करण्यात आली. परंतु, काही सुगावा लागला नाही. आपल्या मार्गावर पोलीस लागल्याची कुणकुण लागल्याने संतोष व प्रियंका यांच्या मनात भीतीचे सावट निर्माण झाले असावे अन् त्यातूनच त्यांनी आत्महत्येचे पाऊल उचलले असावे, असा अंदाज पोलिसांनी वर्तविला आहे. संतोष व प्रियंकाचे मृतदेह शवविच्छेदनानंतर नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आले. दरम्यान, याप्रकरणी पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत वाघुडे, पो.नि. अजय वसावे, पोलीस हवालदार सांगळे, दिनकर चव्हाण करीत आहेत. (वार्ताहर)