विमान प्रवासात हृदयाचा झटका आलेल्या तरुणाचे वाचविले प्राण
By Admin | Updated: April 21, 2017 00:32 IST2017-04-21T00:32:23+5:302017-04-21T00:32:23+5:30
छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळाहून चेन्नईच्या दिशेने जाणाऱ्या इंडिगो एअरलाईन्सने उड्डाण घेतल्यानंतर तीस मिनिटांनी विमानातील ३० वर्षीय

विमान प्रवासात हृदयाचा झटका आलेल्या तरुणाचे वाचविले प्राण
प्राची सोनवणे, नवी मुंबई
छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळाहून चेन्नईच्या दिशेने जाणाऱ्या इंडिगो एअरलाईन्सने उड्डाण घेतल्यानंतर तीस मिनिटांनी विमानातील ३० वर्षीय तरुणाला हृदयविकाराचा झटका आला. या विमानातून प्रवास करणाऱ्या नवी मुंबईतील दोन डॉक्टरांना या घटनेची माहिती मिळताच मदतीसाठी पुढे सरसावले आणि विमानातील प्रथमोपचार पेटीचा वापर करत प्रसंगावधान राखून डॉक्टरांनी प्राथमिक उपचार केले. तत्काळ आणि अचूक उपचार मिळाल्याने या तरुणाचे प्राण बचावले.
नवी मुंबई येथे राहणारे जनरल सर्जन डॉ. प्रशांत शेंडगे, नेत्ररोगतज्ज्ञ डॉ. राजपाल उसनाळे हे दोघेही कुटुंबीयांसोबत तिरुपतीला चालले होते. मुंबईहून त्यांच्या विमानाचे उड्डाण होताच अर्ध्या तासाने एक अत्यावश्यक घोषणा करण्यात आली. यामध्ये एका सहप्रवाशाला हृदयविकाराचा झटका आल्याची माहिती मिळताच या दोघांनीही त्या रुग्णाच्या मदतीकरिता धाव घेतली. छातीत असह्य वेदना, घाम फुटणे अशी लक्षणे पाहता लगेगच त्या तरुणाला आॅक्सिजन पुरवत, विमानातील इर्मजन्सी किटचा वापर करण्यात आला तसेच जवळ असलेली औषधे, ग्लुकोज पाणी देण्यात आले. तरुणाने उपचारांना सकारात्मक प्रतिसाद दिल्याने पुढील दहा मिनिटांमध्ये त्याच्या स्वास्थ्यात सुधार झाल्याची माहिती डॉ. प्रकाश शेंडगे यांनी सांगितले. चेन्नईला पोहोचताच तत्काळ रुग्णवाहिका बोलवून या तरुणाला रुग्णालयात दाखल करण्यात आले. तासाभरात त्या तरुणाच्या प्रकृतीत सुधारणा झाल्याने मानसिक समाधान मिळाल्याची माहिती डॉ. राजपाल उसनाळे यांनी दिली. तत्काळ उपचार न मिळाल्यास जीवही गमवावा लागला असता, अशी माहिती डॉक्टरांनी दिली. तरुणाला याआधीही अशा प्रकारचा त्रास झाल्याचे उघडकीस आले. झालेल्या प्रकाराविषयी बोलताना डॉ. शेंडगे यांनी याआधी त्यांच्या रुग्णालयातील प्रसंगाविषयी माहिती दिली. रात्री साडेअकराच्या सुमारास एका तरुणाला हृदयविकाराचा झटका आला होता. मात्र वेळेवर उपचार न घेतल्याने, दुर्लक्ष केल्याने रुग्णालयात पोहोचेपर्यंत या रुग्णाला प्राण गमवावा लागल्याचे शेंडगे यांनी स्पष्ट केले.