रस्त्यांवर खड्ड्यांच्या पायघड्या
By Admin | Updated: September 3, 2016 02:47 IST2016-09-03T02:47:45+5:302016-09-03T02:47:45+5:30
बाप्पांचे आगमन अवघ्या दोन दिवसांवर येवून ठेपले आहे. त्यानुसार गणेशभक्तांची लगबग सुरू झाली आहे. परंतु शहरातील बहुतांशी रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. रस्त्यांवर

रस्त्यांवर खड्ड्यांच्या पायघड्या
- कमलाकर कांबळे, नवी मुंबई
बाप्पांचे आगमन अवघ्या दोन दिवसांवर येवून ठेपले आहे. त्यानुसार गणेशभक्तांची लगबग सुरू झाली आहे. परंतु शहरातील बहुतांशी रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. रस्त्यांवर मोठमोठे खड्डे पडल्याने गणेशभक्तांनी नाराजी व्यक्त केली आहे. रस्त्यांच्या झालेल्या दुरवस्थेची राज्याच्या नगरविकास विभागाने गंभीर दखल घेतली असून याप्रकरणी तातडीने अहवाल सादर करण्याचे निर्देश महापालिकेला दिले आहेत.
दर्जेदार पायाभूत सुविधांचा गवगवा करणाऱ्या महापालिका प्रशासनाने रस्त्यांच्या दुरवस्थेकडे मात्र सोयीस्कररीत्या दुर्लक्ष केल्याचे दिसून येते. याचा परिणाम म्हणून रस्त्यांची दयनीय अवस्था झाली आहे. शहरातील प्रमुख रस्त्यांसह अंतर्गत रस्त्यांची वाताहत झाली आहे. ठिकठिकाणी पडलेल्या खड्ड्यांमुळे नागरिक हैराण झाले आहेत. वाहनधारकांना तर अक्षरश: कसरत करावी लागत आहे. विशेष म्हणजे रस्त्यांच्या दुरवस्थेचे पडसाद स्थायी समितीच्या बैठकीत ही उमटले होते. तसेच विविध सामाजिक संस्था व दक्ष नागरिकांनी यासंदर्भात वेळोवेळी तक्रारी केल्या आहेत. परंतु प्रशासनाने या तक्रारींना केराची टोपली दाखविली. अनेक ठिकाणी रस्त्यांवरील खड्डे बुजविण्यात आले आहेत. परंतु तेही तकलादू स्वरूपाचे ठरले आहे. या सर्वांचा परिणाम म्हणून आपल्या लाडक्या बाप्पांचे स्वागत खड्ड्यांच्या पायघड्यांनी करण्याची वेळ गणेशभक्तांवर आली आहे. सायन-पनवेल महामार्गाची तर अक्षरश: चाळण झाली आहे. या मार्गावर ठिकठिकाणी उभारण्यात आलेल्या उड्डाण पुलासह त्याच्या खालून वसाहतीकडे जाणारे रस्ते पूर्णत: उखडले आहेत. ठाणे-बेलापूर मार्गावरील उड्डाणपुलाच्या कूर्मगती कामाचा फटका वाहतुकीला बसला आहे.
प्रमुख रस्त्यांसह वसाहतीअंतर्गत रस्त्यांचीही दैना उडाली आहे. यापूर्वी उत्सवापूर्वी शहरातील सर्व रस्त्यांची युध्दपातळीवर डागडुजी करण्याची प्रथा होती. परंतु विद्यमान प्रशासनाने यावर्षी ही प्रथा मोडीत काढल्याने सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांसह गणेशभक्तांनी यासंदर्भात संताप व्यक्त केला आहे.
नगरसेविकेच्या तक्रारीला केराची टोपली
महापालिका आणि सिडकोच्या वादात घणसोलीतील विकासकामांना खीळ बसली आहे. येथील बहुतांशी रस्त्यांची चाळण झाली आहे. प्रभाग क्रमांक ३३ च्या नगरसेविका उषा पाटील यांनी काही दिवसांपूर्वी सिडको व महापालिका प्रशासनाला निवेदन देवून गणेशोत्सवापूर्वी रस्त्यांची डागडुजी करण्याची मागणी केली होती. तसेच रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे उत्सव काळात काही अनुचित घटना घडल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी या दोन्ही प्राधिकरणांची राहील, असे त्यांनी या निवेदनात नमूद केले होते. परंतु दोन्ही प्राधिकरणांनी या निवेदनालाही केराची टोपली दाखविल्याचे दिसून आले आहे.
राज्य शासनाने घेतली दखल
शहरातील रस्त्यांच्या झालेल्या दुरवस्थेबाबत वाशी येथील एक जागरूक नागरिक भरत सामंत यांनी थेट मुख्यमंत्र्यांकडे तक्रार केली होती. त्याची गंभीर दखल नगरविकास विभागाने घेतली आहे. यासंदर्भातील मुद्देनिहाय तपशील तातडीने सादर करण्याचे आदेश नगरविकास विभागाने महापालिकेला दिले आहेत.