बंदोबस्ताअभावी कारवाई स्थगित
By Admin | Updated: June 3, 2016 02:06 IST2016-06-03T02:06:19+5:302016-06-03T02:06:19+5:30
मसाला मार्केटमधील अनधिकृत बांधकाम पाडण्यासाठी महापालिकेने विशेष मोहिमेचे आयोजन केले होते. परंतु शेवटच्या क्षणी पोलिसांनी विधान परिषद निवडणुकीचे कारण देवून

बंदोबस्ताअभावी कारवाई स्थगित
नवी मुंबई : मसाला मार्केटमधील अनधिकृत बांधकाम पाडण्यासाठी महापालिकेने विशेष मोहिमेचे आयोजन केले होते. परंतु शेवटच्या क्षणी पोलिसांनी विधान परिषद निवडणुकीचे कारण देवून बंदोबस्त नाकारला. बंदोबस्त नसल्याने कारवाई थांबवावी लागली आहे. अतिक्रमण वाचविण्यासाठी व्यापाऱ्यांची धावपळ सुरूच असून मार्केट बंद करून दबाव आणण्याचा प्रयत्न करण्यात आला.
नवी मुंबईमधील सर्वात मोठे व्यावसायिक अतिक्रमण बाजार समितीमधील पाच मार्केटमध्ये झाले आहे. व्यापाऱ्यांनी बाजार समितीचे अधिकारी, कर्मचारी व सुरक्षा विभागाच्या संगनमताने मोठ्या प्रमाणात अतिक्रमण केले आहे.
मसाला मार्केटमधील तब्बल ६५० व्यापाऱ्यांनी गाळ्यांमध्ये अनधिकृतपणे पोटमाळा तयार केला असून एक मजल्याचे वाढीव बांधकामही केले आहे. याशिवाय मार्केटच्या बाहेर असणाऱ्या मर्चंट चेंबरमधील दुकानदारांनीही अनधिकृतपणे पोळमाळा तयार केला आहे. महापालिकेने यापूर्वी १६ मे रोजी मार्केटमधील अनधिकृत बांधकाम हटविण्यासाठी मोहीम हाती घेतली होती. परंतु व्यापाऱ्यांनी विरोध केल्यामुळे व आम्ही वाढीव एफएसआय घेतल्याचे कारण देवून कारवाई थांबविली. सर्व कागदपत्रे तपासल्यानंतर बांधकामांना कोणतीही परवानगी घेतली नसल्याचे स्पष्ट झाल्याने गुरुवार २ जून रोजी पुन्हा एकदा मोहीम आयोजित केली होती. पोलिसांना याविषयी पूर्वसूचना देवून बंदोबस्त मागितला होता. पोलिसांनीही बंदोबस्त देण्याचे मान्य केले होते. बुधवारी सायंकाळी एपीएमसी, व्यापारी, पोलीस व महापालिकेच्या अधिकाऱ्यांची बैठक झाली.
महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने एपीएमसीमधील अतिक्रमण पाडण्यासाठी जय्यत तयारी केली होती. सकाळी कर्मचारी, वाहने व इतर यंत्रसामग्री घेवून कारवाई करण्यास निघत असतानाच पोलिसांनी बंदोबस्त देता येत नसल्याचे पत्र विभाग कार्यालयामध्ये पाठविले. (प्रतिनिधी)