अंबा नदीवरील पूल वाहतुकीस धोकादायक
By Admin | Updated: August 17, 2016 03:14 IST2016-08-17T03:14:42+5:302016-08-17T03:14:42+5:30
मुंबई-गोवा महामार्गावरील महाडजवळील पूल कोसळून झालेल्या दुर्घटनेनंतर खडबडून जागे झालेल्या सार्वजनिक बांधकाम विभागाने राज्यातील सर्वच ब्रिटिशकालीन व धोकादायक पुलांचे

अंबा नदीवरील पूल वाहतुकीस धोकादायक
पाली : मुंबई-गोवा महामार्गावरील महाडजवळील पूल कोसळून झालेल्या दुर्घटनेनंतर खडबडून जागे झालेल्या सार्वजनिक बांधकाम विभागाने राज्यातील सर्वच ब्रिटिशकालीन व धोकादायक पुलांचे स्ट्रक्चरल आॅडिट करण्याचा निर्णय घेतला आहे. परंतु पुलाच्या भारवाहन क्षमतेपेक्षा जास्त क्षमतेच्या वाहनांची वर्षानुवर्षे वाहतूक सुरू असताना याकडे केवळ बघ्याची भूमिका घेऊन संबंधित शासकीय यंत्रणा कानाडोळा करीत असेल तर सुदैवाने अकस्मीत अपघात झाला तर याला जबाबदार कोण? अशी चर्चा वाकण - पाली - खोपोली राज्यमार्गावरील अंबा नदीवरील असलेल्या पुलाच्या बाबतीत होताना दिसत आहे. तसेच अतिभार क्षमतेची अवजड वाहने आणि ओव्हरलोड वाळू , कोळसा व कॉइलची होणारी वाहतूक रोखण्यात यावी, अशी मागणी सुधागडवासीयांकडून होत आहे.
सार्वजनिक बांधकाम उपविभाग सुधागड-पाली यांच्या अखत्यारीत असलेल्या रस्त्यांपैकी वाकण - पाली - खोपोली या राज्यमार्ग क्र . ९३वर एकूण चार पूल आहेत. मुंबई-गोवा व मुंबई-पुणे या महामार्गांना जोडणारा रायगड जिल्ह्यातील अत्यंत महत्त्वाचा मार्ग समजल्या जाणाऱ्या पाली येथील अंबा नदीवरील पूल ७७ मीटर लांबीचा आहे. या पुलाचे बांधकाम १९५५मध्ये करण्यात आले आहे. जवळपास ६० वर्षे या पुलाला पूर्ण झाली आहेत. या पुलाची भारवाहन क्षमता फक्त १९ टन इतकीच आहे. तसेच पेडली येथील पुलाचे बांधकाम १९६५मध्ये झाले असून, त्याची लांबी ४२ मीटर आहे. जांभूळपाडा येथील पुलाचे बांधकाम १९५५मध्ये तर सागडे येथील पुलाचे बांधकाम १९६३मध्ये झालेले आहे. या सर्व पुलांची भारवाहन क्षमता फक्त १९ टन इतकीच आहे.
या चारही पुलांचे बांधकाम दगडी असून, हे पूल जवळपास ५० ते ६० वर्षे पावसाला व अंबा नदीला आलेल्या पुराला तसेच १९८९मध्ये झालेल्या महाप्रलयाला तोंड देत आजही खंबीरपणे सेवा देत आहेत. या पुलांवरून जाणाऱ्या वाहनांची वाहन क्षमता व सध्या वाहतूक होत असलेल्या वाहतुकीचा भार यांचे गणित केले गेले नाही, तर महाड घटनेची पुनरावृत्ती होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
(वार्ताहर)
अवजड वाहतूक बंद करण्याची मागणी
1नांदगाव/ मुरूड : अलिबाग व मुरूड या दोन तालुक्यांना जोडणारा महत्त्वाचा पूल म्हणजे साळाव पूल. या पुलाच्या शेजारी जेएसडब्ल्यू कंपनी असून, या पुलावरून ४० टन क्षमतेच्या अवजड वाहनांची वाहतूक होत असते, त्यामुळे हा महत्त्वाचा पूल लवकरच कमकुवत होऊन वाहतुकीचा गंभीर प्रश्न निर्माण होऊ शकतो.
2ही सत्य परिस्थिती शासनाच्या निदर्शनास यावी म्हणून ‘आपले सरकार’ या शासनाच्या वेब साईटवर तक्र ार दाखल केल्याची माहिती शेतकरी कामगार पक्षाचे युवक शहर अध्यक्ष आशिष दिवेकर यांनी दिली. याबाबतची तक्र ार त्यांनी गृह विभाग परिवहन व बंदरे व सार्वजनिक बांधकाम खाते मंत्रालय मुंबई यांच्याकडे केली आहे.
3आशिष दिवेकर म्हणाले की, साळाव पूल हा वाहतुकीसाठी महत्त्वाचा आहे. या पुलामुळे मुंबई जवळ आली असून, पर्यटकसंख्या वाढून मुरूड तालुक्याचा विकास होण्यास मदत झाली आहे. जेएसडब्लू कंपनी या पुलाचा वापर अवजड वाहतुकीसाठी करते. ४० टन क्षमतेचे ट्रक या पुलावरून ये- जा करीत असल्याने हा पूल कमकुवत झाला आहे.