महापालिका मतदार याद्यांमध्ये महाघोळ
By Admin | Updated: March 16, 2017 03:17 IST2017-03-16T03:17:03+5:302017-03-16T03:17:03+5:30
पनवेल महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदार याद्या जाहीर करण्यात आल्या आहेत. मात्र त्यामध्ये मोठ्या प्रमाणात घोळ असल्याचे उघड झाले आहे.

महापालिका मतदार याद्यांमध्ये महाघोळ
कळंबोली : पनवेल महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदार याद्या जाहीर करण्यात आल्या आहेत. मात्र त्यामध्ये मोठ्या प्रमाणात घोळ असल्याचे उघड झाले आहे. याविरोधात भारतीय जनता पक्षाने दंड थोपटले आहेत. नवीन पनवेलमध्ये जे उमेदवार आहेत त्यांची नावे गायब झाली असल्याची तक्र ार महापालिका प्रशासनाकडे करण्यात आली आहे. अनेकांचे नावे दुसऱ्या प्रभागात गेल्याने तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली आहे. त्यामुळे भारतीय जनता पक्षाकडून गुरुवारी उपोषणाचे हत्यार उपसले आहे.
पनवेल महानगरपालिका स्थापन झाल्यानंतर नव्याने प्रभाग रचना झाली आहे. प्रभागाचे प्रारूप जाहीर झाले आहेत त्याचबरोबर बदललेल्या प्रभाग रचनेनुसार मतदार याद्या नव्याने तयार करण्यात आल्या. मतदार याद्या नागरिकांच्या हरकती व सूचनांसाठी प्रसिध्द करण्यात आल्या आहेत. मतदार याद्या जाहीर झाल्यानंतर राजकीय पक्ष आणि इच्छुक उमेदवारांच्या तोंडचे पाणी पळाले आहे. काहींचे हक्काचे मतदान दुसऱ्या प्रभागात गेले आहेत. नवीन पनवेलमधील अनेकांचे नावे पनवेल आणि खांदा वसाहतीत गेली आहेत. याविरोधात भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना आक्षेप नोंदवला आहे. प्रभाग क्र मांक १७ मधील काही मतदारांची नावे प्रभाग २0मध्ये गेली आहेत.
पनवेल शहर, तक्का, नवनाथनगर झोपडपट्टीत अनोळखी नावे आली असल्याचा आरोप अॅड. मनोज भुजबळ यांनी केला आहे. प्रभाग १४ मध्ये समाविष्ट करण्यात आलेले सेक्टरमधील मतदार यादीतून गायब झाले आहेत. याबाबत आम्ही अगोदरच उपायुक्त मंगेश चितळे, भगवान खाडे आणि गणेश साळवी यांना माहिती दिली होती. त्यावेळी त्यांनी प्रारूप यादीमध्ये दुरुस्ती करण्याचे आश्वासन दिले होते. परंतु त्यामध्ये कोणताही बदल करण्यात आला नसल्याचे भुजबळ यांनी सांगितले. हा प्रकार काही कर्मचारी आणि अधिकाऱ्यांनी हेतूपुरस्सर केला असल्याचा आरोप सुध्दा भारतीय जनता पक्षाच्या शिष्टमंडळाने दिलेल्या निवेदनात केला आहे. भगवान खाडे यांना निवेदन देताना माजी उपनगराध्यक्ष सुभाष भुजबळ, प्रकाश बिनेदार, मनोहर म्हात्रे, सी. सी.भगत, श्रीकांत ठाकूर उपस्थित होते.