पनवेल महानगरपालिकेच्या निकालानंतर राजकीय उलथापालथ

By Admin | Updated: June 1, 2017 05:33 IST2017-06-01T05:33:19+5:302017-06-01T05:33:19+5:30

पनवेल महानगरपालिकेची निवडणूक नुकतीच पार पडली. भाजपाने या निवडणुकीत घवघवीत यश प्राप्त करीत पनवेल महानगरपालिकेच्या

Political upheaval after the results of the Panvel Municipal Corporation | पनवेल महानगरपालिकेच्या निकालानंतर राजकीय उलथापालथ

पनवेल महानगरपालिकेच्या निकालानंतर राजकीय उलथापालथ

वैभव गायकर / लोकमत न्यूज नेटवर्क
पनवेल : पनवेल महानगरपालिकेची निवडणूक नुकतीच पार पडली. भाजपाने या निवडणुकीत घवघवीत यश प्राप्त करीत पनवेल महानगरपालिकेच्या पहिल्याच महानगरपालिका निवडणुकीत ५१ जागा जिंकत एकहाती सत्ता आणली. विशेष म्हणजे एकीकडे महाआघाडी स्थापन करीत शेकाप, राष्ट्रवादी, काँग्रेसची भाजपाला दिलेली झुंज अपयशी ठरल्याने या पक्षातील पदाधिकाऱ्यांच्या उचलबांगडीला सुरुवात झाली असून पक्षाला आलेल्या अपयशाने राजकीय उलथापालथ सुरू झाली आहे.
महानगरपालिका निवडणुकीत राष्ट्रीय पक्ष असलेले काँग्रेस, राष्ट्रवादीने शेकापसोबत जाण्याचा निर्णय घेतला होता. मात्र शेकापसोबत या दोन्ही पक्षाला आलेली मरगळ झटकून काढण्यासाठी पक्षनेतृत्वाने पावले उचलण्यास सुरूवात केल्याचे समजते. काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आर. सी. घरत यांनी पालिका निवडणुकीच्या निकालानंतर जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा दिला आहे. पनवेल महानगरपालिकेत आलेल्या अपयशाबद्दल घरत यांनी हा राजीनामा दिला असल्याचे बोलले जाते. तर राष्ट्रवादीने तालुका प्रमुख पदी प्रभाग क्र मांक ९ मधून नगरसेवक पदी निवडून आलेल्या सतीश पाटील यांची निवड केली आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादी दोघांना अवघ्या दोन जागा मिळाल्या असल्याने नजीकच्या काळात दोन्ही पक्षांची पुनर्बांधणी करण्यात येणार आहे. पालिका निवडणुकीत आणखी एक महत्त्वाचा पक्ष म्हणजे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सभा घेऊन देखील पक्षाला साधा भोपळा पण फोडता आला नसल्याने पक्षनेतृत्व मोठ्या प्रमाणात नाराज असल्याचे समजते. निवडणुकीपूर्वीच तालुका प्रमुख वासुदेव घरत यांनी तालुका प्रमुख पदाचा राजीनामा दिला होता. निवडणुकीत पक्षाला अपेक्षित यश प्राप्त होणार नाही असे भाकीत त्यांनी राजीनामा देतेवेळी व्यक्त केले होते आणि झालेही तसेच.
ग्रामीण भागातील तालुका प्रमुख रामदास पाटील यांना देखील प्रभाग क्रमांक १ मधून पराभवाची धूळ चाखावी लागल्याने पनवेलमधील शिवसेना संकटात आली आहे. मंत्री एकनाथ शिंदे, सचिव आदेश बांदेकर यांचा करिष्मा देखील पक्षाला तारू शकला नसल्याने शिवसेनेला पनवेलमध्ये विचार विनिमयाची आवश्यकता आहे. मनसेची अवस्था देखील अगदी बिकट होऊन बसली आहे. मनसेने उभ्या केलेल्या २५ उमेदवारांना अपेक्षेपेक्षा कमी मते मिळाल्याने पनवेलमध्ये मनसे हद्दपारीच्या मार्गावर आहे. जिल्हा चिटणीस केसरीनाथ पाटील यांना देखील पराभवाला सामोरे जावे लागले. केसरीनाथ पाटील यांनी २००९ साली पनवेल विधानसभा मतदार संघातून आमदारकी लढविली आहे.
शेकापला देखील पनवेल महानगरपालिका निवडणुकीत अपेक्षित यश प्राप्त झाले नाही. २३ जागा जिंकून शेकाप दोन नंबरवर फेकला गेला. शेकापला देखील आगामी विधानसभा निवडणुकीला सामोरे जाण्यापूर्वी शहरी मतदारांच्या प्रश्नांसंदर्भात अथवा समस्यांसंदर्भात ठोस भूमिका बजावावी लागेल अन्यथा त्याचा फटका त्यांना बसू शकतो. विशेष म्हणजे स्थानिक पक्ष म्हणून शेकापला आपली ओळख पुसून टाकावी लागणार आहे. भाजपाने विकासाचा मुद्दा पुढे करून लढविलेल्या निवडणुका त्यांच्या यशाला कारणीभूत असल्याने भविष्यात निवडणुका याच मुद्द्यावर लढाव्या लागणार असल्याचे पनवेल महानगर पालिका निवडणुकीत स्पष्ट झाले आहे. केवळ आरोप- प्रत्यारोपणाच्या राजकारणावर निवडणुका जिंकता येणार नाही याची दखल घेणे गरजेचे आहे.

शेकापला मोठा धक्का

पनवेल तालुक्यातील सर्वात मजबूत पक्ष म्हणून शेकापकडे पाहिले जात होते. भाजपाला कडवे आव्हान निर्माण करण्याचे काम केवळ शेकापनेच पनवेलमध्ये केले होते. मात्र शेकापची विचारधारा शहरी मतदारांपर्यंत पोहचू शकली नसल्याने शहरी भागात शेकापला मोठा फटका बसला.

Web Title: Political upheaval after the results of the Panvel Municipal Corporation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.