तराफ्यासाठी पोलिसांत धाव
By Admin | Updated: March 9, 2016 03:45 IST2016-03-09T03:45:23+5:302016-03-09T03:45:23+5:30
तालुक्यातील मांडवा येथील प्रवासी जेटीला सुमारे पाच कोटी रुपये खर्चून तराफा बसविण्यात आला होता. मात्र मार्च २०१५ मध्ये त्या तराफ्याचा समुद्राला आलेल्या उधाणापुढे टिकाव लागला नाही

तराफ्यासाठी पोलिसांत धाव
अलिबाग : तालुक्यातील मांडवा येथील प्रवासी जेटीला सुमारे पाच कोटी रुपये खर्चून तराफा बसविण्यात आला होता. मात्र मार्च २०१५ मध्ये त्या तराफ्याचा समुद्राला आलेल्या उधाणापुढे टिकाव लागला नाही. त्या घटनेनंतर तो तराफा तेथून हटविण्यात आला होता. सार्वजनिक हितार्थ त्या तराफ्याचा शोध घेण्यासाठी पोलिसांत तक्रार दाखल करणार असल्याची माहिती या प्रकरणामधील अनियमितता उघड करणारे माहिती अधिकार कार्यकर्ते संजय सावंत यांनी दिली.
अलिबाग, मुरुड आणि श्रीवर्धन तालुक्यात पर्यटन मोठ्या संख्येने वाढत आहे. मुंबईहून येणारे पर्यटक हे गेटवे आॅफ इंडिया ते मांडवा जेटी असा प्रवास करतात. जलमार्गे प्रवास करणाऱ्यांची संख्या झपाट्याने वाढत असल्याने त्या ठिकाणी सोयीसुविधा निर्माण करण्याची गरज होती. बोटीतून जेटीवर जाण्यासाठी प्रवाशांना भरतीच्या वेळी मोठी कसरत करावी लागायची. त्यामध्ये प्रामुख्याने महिला, लहान मुले आणि वृध्दांना जास्त त्रास व्हायचा. यावेळी अपघातही झाले आहेत. यातून मार्ग काढण्यासाठी मेरीटाइम बोर्डाने २०१२ मध्ये मांडवा येथे जेटीवर तराफा बसविण्याला मंजुरी दिली.
ओशियन ब्लू कंपनीला या कामाचे कंत्राट देण्यात आले होते. सुमारे पाच कोटी रुपयांचे हे कंत्राट होते. २०१२ मध्ये मंजूर झालेला तराफा जेटीजवळ बसविण्यासाठी २०१५ उजाडले, मात्र मार्च २०१५ मध्ये भरतीच्या प्रचंड उधाणापुढे त्याचा टिकाव लागला नाही. भरतीच्या पाण्यात तो तराफा कलंडला गेला होता. त्यानंतर मेरीटाइम बोर्डाने तो तेथून हलविला होता.
या कालावधीमध्ये पर्यटनाचा एक हंगाम संपला तर आता दुसरा हातातून जात आहे, तरी तराफा बसला नसल्याचे सावंत यांनी सांगितले. सावंत यांनी माहितीच्या अधिकारात मिळविलेल्या माहितीमध्ये हा तराफा प्रायोगिक तत्त्वावर उभारण्यात आला होता.
प्रायोगिक तत्त्वावर तराफा उभारण्यासाठी कोट्यवधी रुपयांचा चुराडा कशासाठी, असा प्रश्नही सावंत यांनी उपस्थित केला होता.
(प्रतिनिधी)