ज्येष्ठांच्या सुरक्षेला पोलिसांचा ‘प्रतिसाद‘

By Admin | Updated: May 29, 2016 03:12 IST2016-05-29T03:12:43+5:302016-05-29T03:12:43+5:30

संकटसमयी ज्येष्ठ नागरिकांना तत्काळ पोलिसांची मदत मिळावी, या उद्देशाने राज्य पोलिसांतर्फे ‘प्रतिसाद‘ हे मोबाइल अ‍ॅप्लिकेशन बनविण्यात आले आहे. या अ‍ॅपचा लोकार्पण सोहळा

Police response to safety of senior citizens | ज्येष्ठांच्या सुरक्षेला पोलिसांचा ‘प्रतिसाद‘

ज्येष्ठांच्या सुरक्षेला पोलिसांचा ‘प्रतिसाद‘

नवी मुंबई : संकटसमयी ज्येष्ठ नागरिकांना तत्काळ पोलिसांची मदत मिळावी, या उद्देशाने राज्य पोलिसांतर्फे ‘प्रतिसाद‘ हे मोबाइल अ‍ॅप्लिकेशन बनविण्यात आले आहे. या अ‍ॅपचा लोकार्पण सोहळा व ज्येष्ठ नागरिकांना सुरक्षेची माहिती देण्याकरिता नेरूळ येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांनी उपस्थित ज्येष्ठांना सुरक्षेविषयी मार्गदर्शन केले.
बदलत्या कुटुंब व्यवस्थेमुळे काहीसे दुर्लक्षित होत चाललेल्या ज्येष्ठांसाठी महापालिकेसह पोलीस प्रशासन सातत्याने विविध उपक्रम राबवत असते. महापालिकेने ज्येष्ठांसाठी विरंगुळा केंद्रांची स्थापना केलेली असून, नवी मुंबई पोलिसांकडून मेळाव्याच्या माध्यमातून ज्येष्ठांचे मनोरंजन केले जाते. परंतु सुरक्षा हा देखील त्यांच्यासाठी महत्त्वाचा मुद्दा आहे. यामुळे ज्येष्ठांच्या सुरक्षेवर पोलिसांकडून विशेष भर दिला जात आहे. नोकरी- व्यवसायानिमित्ताने मुले व सुना घराबाहेर जात असल्यामुळे अनेक ज्येष्ठ नागरिक घरामध्ये एकटेच असतात. यामुळे त्यांच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर होत चालला आहे. एकाकी राहणाऱ्या ज्येष्ठांवर हल्ले करून घरफोडीचे गुन्हे घडत आहेत. अशा घटनांमध्ये मुंबई, नवी मुंबईत काही ज्येष्ठांचे प्राण देखील गेलेले आहेत. त्यामुळे राज्य पोलिसांच्या वतीने ‘प्रतिसाद‘ नावाचे मोबाइल अ‍ॅप्लिकेशन तयार करण्यात आले आहे. या अ‍ॅप्लिकेशनचे लोकार्पण करून त्याची माहिती देण्याकरिता नेरूळ पोलिसांच्या वतीने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. वंडर्स पार्कमध्ये झालेल्या या कार्यक्रमास पोलीस आयुक्त हेमंत नगराळे, उपायुक्त प्रशांत खैरे, साहाय्यक आयुक्त धनराज दायमा, अखिल भारतीय जेष्ठ नागरिक महासंघाचे अजीवन सदस्य शंकर किंजवडेकर, वर्षा रोकडे, वरिष्ठ निरीक्षक अधिकराव पोळ आदी उपस्थित होते.
यावेळी संकटसमयी मोबाइलमधील प्रतिसाद अ‍ॅप्लिकेशन कसे वापरायचे, याची माहिती ज्येष्ठांना देण्यात आली. कार्यक्रमादरम्यान आयुक्त नगराळे यांनीच उपस्थितांच्या समक्ष अ‍ॅप्लिकेशनचा वापर करून पोलिसांची तत्काळ मदत कशी उपलब्ध होते, याचे प्रात्यक्षिक करून दाखवले. तसेच ज्येष्ठांच्या रक्षणासाठी पोलीस सदैव तत्पर असल्याचे सांगत एकाकी राहणाऱ्या ज्येष्ठांमधील भीती दूर केली. सदर कार्यक्रमास ज्येष्ठ नागरिक उपस्थित होते. (प्रतिनिधी)

Web Title: Police response to safety of senior citizens