‘पोलीस’ गाड्यांचा दबदबा
By Admin | Updated: October 31, 2015 00:20 IST2015-10-31T00:20:43+5:302015-10-31T00:20:43+5:30
शासकीय वाहन वगळून कर्मचाऱ्यांनी खाजगी वाहनांवर पोलीस लिहू नये असा नियम आहे. परंतु नवी मुंबई पोलिसांनी नियमांचे उल्लंघन सुरू केले आहे

‘पोलीस’ गाड्यांचा दबदबा
नामदेव मोरे, नवी मुंबई
शासकीय वाहन वगळून कर्मचाऱ्यांनी खाजगी वाहनांवर पोलीस लिहू नये असा नियम आहे. परंतु नवी मुंबई पोलिसांनी नियमांचे उल्लंघन सुरू केले आहे. खाजगी वाहनांवर बिनधास्तपणे पोलीस नावाची पाटी लावत आहेत. पोलीस दलाशी काहीही संबंध नसलेले नागरिकही वाहतूक विभागाची कारवाई टाळण्यासाठी व टोल वाचविण्यासाठी या पाट्यांचा वापर करू लागले आहेत.
नवी मुंबईमध्ये वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर वाहतूक पोलीस नियमित कारवाई करत असतात. गतवर्षी तब्बल दीड लाख वाहनांवर कारवाई करून त्यांच्याकडून जवळपास तीन कोटी रूपये दंड वसूल केला होता. यामध्ये नो पार्किंगमध्ये वाहने उभी करणाऱ्यांवर सर्वाधिक ७३५८१ जणांवर कारवाई केली होती. कायद्याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई करण्याची जबाबदारी असणारे पोलीस स्वत:च मात्र बिनधास्त कायद्याचे उल्लंघन करत आहेत. सरकारी वाहन सोडून खाजगी वाहनांवर पोलीस लिहू नये असा नियम आहे. या नियमांचे काटेकोर पालन करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. परंतु यानंतरही नवी मुंबईमधील बहुतांश ९५ टक्के पोलीस कर्मचारी खाजगी वाहनांवर पोलीस लिहू लागले आहेत. कारमध्ये पोलीस नावाची पाटी लावलेली असते.
पोलीस मुख्यालयाच्या गेटपासून ते पार्क हॉटेलपर्यंत उभ्या केलेल्या २० ते २५ कारवर पोलीस नावाची पाटी लावलेली असते. साध्या गणवेशामध्ये असल्यानंतर सर्वांना कळावे या गाडीवर पोलीस आहेत, यासाठी स्टीकर लावले जाते. टोलमध्ये सूट मिळविण्याचाही काही जण प्रयत्न करतात. नवी मुंबईमध्ये पार्किंगची समस्या गंभीर झाली आहे. वाहने उभी करण्यासाठी जागाच नसते. रोडवर वाहने उभी केली की कारवाई केली जाते. यामुळे पोलीस अधिकारी व कर्मचारी खाजगी वाहनांवर पोलीस लिहीत आहेत. ज्या वाहनांवर ही पाटी असेल त्यांच्यावर कधीच कारवाई होत नाही. याचाच गैरफायदा पोलीस दलाशी काहीही संबंध नसलेले नागरिकही घेवू लागले आहेत. ज्यांचा या विभागाशी काहीही संबंध नाही त्यांच्या वाहनांवरही पोलीस लिहिले जात आहे. भविष्यात अशीच स्थिती राहिली तर गुन्हेगारही त्यांच्या गाडीवर पोलीस लिहतील असे मत नागरिक व्यक्त करू लागले आहेत.
पोलीस मुख्यालयाच्या गेटपासून ते पार्क हॉटेलपर्यंत उभ्या २० ते २५ कारवर पोलीस नावाची पाटी दिसते. ५० पेक्षा जास्त मोटारसायकलवर पोलीस लिहिलेले असते. प्रत्येक पोलीस ठाण्याच्या आवारात ४ ते ५ कार व २० ते ३० मोटारसायकलवर पोलीस लिहिलेले असते.
पोलीस व प्रेस लिहिलेल्या वाहनांवर वाहतूक पोलीस शक्यतो कधीच कारवाई करत नाहीत. यामुळे शहरात १ हजारपेक्षा जास्त वाहनांवर प्रेसच्या पाट्या झळकत आहेत. त्याच्यापेक्षा काही पट वाहनांवर पोलीस लिहिलेले असते.
या वाहनांवर कारवाई होत नसल्यामुळे भविष्यात गुन्हेगार अशा पाट्या लावून वाहनांचा गुन्ह्यांसाठी वापर करण्याची भीतीही नागरिक व्यक्त करू लागले आहेत.