डीजे, ढोल पथकांना पोलिसांची तंबी
By Admin | Updated: April 22, 2017 02:56 IST2017-04-22T02:56:12+5:302017-04-22T02:56:12+5:30
समारंभात रात्री उशिरापर्यंत वाजवल्या जाणाऱ्या डीजेला यापुढे लगाम घालण्याचा प्रयत्न पोलिसांकडून सुरू आहे. कोपरखैरणे व करावे येथे घडलेल्या घटनेच्या पार्श्वभूमीवर

डीजे, ढोल पथकांना पोलिसांची तंबी
नवी मुंबई : समारंभात रात्री उशिरापर्यंत वाजवल्या जाणाऱ्या डीजेला यापुढे लगाम घालण्याचा प्रयत्न पोलिसांकडून सुरू आहे. कोपरखैरणे व करावे येथे घडलेल्या घटनेच्या पार्श्वभूमीवर पोलिसांच्या या हालचाली सुरू आहेत. त्याकरिता काही दिवसातच प्रत्येक पोलीस ठाणेनिहाय डीजे व ढोल पथकांना नोटिसा बजावल्या जाणार आहेत.
बुधवारी मध्यरात्री नवी मुंबई पोलिसांनी उशिरापर्यंत चाललेल्या हळदीच्या डीजेवर तीन ठिकाणी कारवाई केली. कोपरखैरणे, करावे व बेलापूर याठिकाणी झालेल्या या कारवाईदरम्यान स्थानिकांसोबत झालेल्या वादातून पोलिसांना लाठीहल्ला करावा लागला. या प्रकारात सहा जणांसह दोन पोलीसही जखमी झाले आहेत. तर तिघांना पोलिसांनी अटक केली असून डीजेचे साहित्यही जप्त केले आहे. मात्र पोलिसांकडून महिलांनाही मारहाण झाल्यामुळे या कारवाईचा निषेध व्यक्त होत आहे. तर दोषी पोलिसांवर देखील कारवाई व्हावी, अशी मागणी देखील लोकप्रतिनिधींकडून पोलीस उपआयुक्तांकडे करण्यात आली आहे. यापूर्वी सानपाडा येथे देखील रात्री उशिरापर्यंत चाललेल्या कौटुंबिक समारंभाचा डीजे थांबवल्यामुळे वाद उद्भवून तरुणांनी पोलिसांच्या पथकावर सोडा व बीअरच्या बाटल्या फेकल्याचा प्रकार घडला होता. त्यामुळे सध्याचे प्रकरण तूर्तास निवळले असले तरी देखील भविष्यात पुन्हा हळदी समारंभात वाजवल्या जाणाऱ्या डीजेवरून वाद उद्भवण्याची शक्यता आहे. याची खबरदारी म्हणून रात्री उशिरापर्यंत चालणारे डीजे यापुढे पूर्णपणे बंद करण्याच्या प्रयत्नात नवी मुंबई पोलीस आहेत. त्याकरिता शहरातील सर्व डीजे व ढोल पथक यांना नोटीस बजावली जाणार असल्याचे सह आयुक्त मधुकर पांडे यांनी सांगितले. प्रत्येक पोलीस ठाण्यामार्फत त्याची पूर्तता केली जाणार आहे. त्याकरिता सर्व डीजे व ढोल पथकांची बैठक देखील घेतली जाणार आहे. या बैठकीत त्यांना रात्री १० वाजल्यानंतर वाद्य बंद करण्याची सक्त ताकीद दिली जाणार असल्याचेही पांडे यांनी सांगितले. त्यामुळे समारंभ आयोजकाचा आग्रह असला तरीही डीजे चालकाला वेळेतच वाद्य बंद करणे भाग पडणार आहे. अन्यथा त्यांच्यावर ध्वनिप्रदूषण केल्याप्रकरणी व न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हे दाखल होण्याची शक्यता आहे. तसेच समारंभ सुरू असतानाच आयोजकांनाही लेखी नोटीस बजावून त्याठिकाणचे वाद्य १० वाजताच बंद करण्याचे सूचित केले जाणार आहे. त्यामुळे गणेशोत्सव व नवरात्रीपाठोपाठ कौटुंबिक समारंभाला देखील रात्री वेळेचे बंधन पाळावे लागणार आहे. (प्रतिनिधी)
- शहरातील सर्व डीजे व ढोल पथक यांना नोटीस बजावली जाणार आहे. प्रत्येक पोलीस ठाण्यामार्फत त्याची पूर्तता करून डीजे व ढोल पथकांची बैठक देखील घेतली जाणार आहे. या बैठकीत त्यांना रात्री १० वाजल्यानंतर वाद्य बंद करण्याची सक्त ताकीद दिली जाणार असल्याचेही पांडे यांनी सांगितले.