खारघरमध्ये विषबाधा
By Admin | Updated: February 26, 2017 03:03 IST2017-02-26T03:03:12+5:302017-02-26T03:03:12+5:30
खारघरमधील पदपथावर असलेल्या डेली बेली नावाच्या दुकानातील बिर्याणी व शोरमा खाल्याने १५ ते २० जणांना विषबाधा झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

खारघरमध्ये विषबाधा
पनवेल : खारघरमधील पदपथावर असलेल्या डेली बेली नावाच्या दुकानातील बिर्याणी व शोरमा खाल्याने १५ ते २० जणांना विषबाधा झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ही घटना गुरुवारी घडली असून शनिवारी सायंकाळी एका महिलेने या प्रकरणी खारघर पोलिस ठाण्यात तक्रार नोंदविली आहे.
खारघरमधील हिरानंदानी परिसरात डेली बेली हे शोरमा व बिर्याणीचे प्रसिद्ध दुकान असून खारघरबरोबरच पनवेल, कळंबोली, कामोठे परिसरांतील अनेक खवय्ये या ठिकाणी येतात. गुरुवारी येथील खाद्यपदार्थ खाल्ल्याने अनेकांना उलटी, जुलाब, तसेच अस्वस्थ वाटू लागले. त्यामुळे अनेकांनी आपापल्या परिसरातील दवाखान्यात तात्पुरते उपचार घेतले. मात्र, काहींना जास्त त्रास होऊ लागल्याने खाद्यपदार्थातून विषबाधा झाल्याचे उघडकीस आले. या प्रकारानंतर संबंधित दुकानाचा मालक फरार आहे. खारघर मित्र, संजीवनी, श्री रुग्णालय आदी दवाखान्यांत विषबाधा झालेल्या रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तर काहींना औषधोपचारानंतर सोडण्यात आले आहे.
संजीवनी दवाखान्यात उपचार घेणाऱ्या हृतिक ठाकूर या विषबाधा झालेल्या तरुणाने सांगितले की, रविवारी रात्री डेली बेली या ठिकाणी खाद्यपदार्थ खाल्ले, त्यानंतर उलटी, जुलाब, थंडी, ताप तसेच अंगदुखीचा त्रास सुरू झाला. दवाखान्यात दाखल केल्यानंतर खाद्यपदार्थातून विषबाधा झाल्याचे निदान डॉक्टरांनी केले. जवळपास पंधरा ते वीस जणांना विषबाधा झाल्याची शक्यता विविध दवाखान्यांत आलेल्या रुग्णांच्या संख्येवरून वर्तवण्यात येत आहे. ही घटना उलटून तीन ते चार दिवसांच्या कालावधीनंतर शनिवारी सायंकाळी एका महिलेने या प्रकरणी खारघर पोलिस ठाण्यात तक्रार नोंदविली आहे. (प्रतिनिधी)
आयुक्तांनी घेतली दखल
पनवेलच्या आयुक्तांनी या घटनेची गंभीर दखल घेतली आहे. अनेक दिवसांपासून अनधिकृत पदपथावर सुरु असलेल्या कारवाईची मोहीम आणखी तीव्र करणार असल्याचे पनवेल महानगरपालिका आयुक्त डॉ. सुधाकर शिंदे यांनी सांगितले. शनिवारी आयुक्तांनी स्वत: रस्त्यावर उतरून उघड्यावर खाद्यपदार्थ विकणाऱ्या दुकानदारांवर कारवाई केली.
- खारघर शहर काँग्रेसचे कार्याध्यक्ष डॉ. स्वप्निल पवार यांनी संजीवनी दवाखान्यात जाऊन विषबाधा झालेल्या रु ग्णाची भेट घेतली. तसेच उघड्यावर खाद्यपदार्थ विकणाऱ्यांवर सक्त कारवाई करण्याची मागणी प्रशासनाकडे करणार असल्याचे पवार यांनी सांगितले.
सर्वोच्च न्यायालयानेही उघड्यावर खाद्यपदार्थ विकण्यास मनाई केली आहे. मात्र, तरीही शहरात अनेक ठिकाणी हातगाड्या, रस्त्यालगत स्टॉल लावून त्यांची विक्री होत आहे. या खाद्यपदार्थांचा दर्जाही चांगला नसल्याने नागरिकांनी हे पदार्थ खाणे टाळावे, असे आवाहन डॉक्टरांकडून करण्यात आले आहे.
खारघरमधील विषबाधेसंदर्भात तपास करीत आहोत. विषबाधा झालेल्यांपैकी एकही व्यक्ती अद्याप तक्रारीसाठी पुढे आलेली नाही. तक्रार केल्यास आम्हाला तपासात मदत होईल.
- दिलीप काळे,
पोलीस निरीक्षक, खारघर