आश्रमशाळेतील १३ मुलींना विषबाधा
By Admin | Updated: March 1, 2016 02:37 IST2016-03-01T02:37:32+5:302016-03-01T02:37:32+5:30
कर्जत तालुक्यातील आदिवासी विद्यार्थ्यांच्या भक्ताची वाडी येथील आदिवासी आश्रमशाळेतील मुलींना रविवारी मध्यरात्री अन्नातून विषबाधा झाली आहे

आश्रमशाळेतील १३ मुलींना विषबाधा
नेरळ :कर्जत तालुक्यातील आदिवासी विद्यार्थ्यांच्या भक्ताची वाडी येथील आदिवासी आश्रमशाळेतील मुलींना रविवारी मध्यरात्री अन्नातून विषबाधा झाली आहे. दुपारपर्यंत विषबाधा झालेल्या १३ मुलींपैकी दोन मुलींना उपचार करून सोडले असून, अन्य ११ मुलींवर उपचार सुरू आहेत.
भक्ताची वाडी आदिवासी आश्रमशाळेतील मुली रविवार रात्रीचे जेवण उरकून रात्री उशिरापर्यंत अभ्यास करीत होत्या. त्यातील काही मुलींना पहाटे तीनच्या सुमारास उलट्या आणि जुलाब सुरू झाले. त्यांच्या सहकारी मैत्रिणी यांनी आश्रमशाळेचे पुरुष मुख्याध्यापक मुकुंद पाटील यांना सदर घटनेची माहिती दिली. तेथे मुलींची आश्रमशाळा असतानादेखील महिला मुख्याध्यापक पद आदिवासी उपयोजनेकडून सातत्याने मागणी होऊन देखील भरले जात नाही. तेथे आॅन ड्युटी असलेले मुख्याध्यापक पाटील यांनी विषबाधा झालेल्या सर्व १३ मुलींना प्राथमिक उपचार करण्यासाठी भक्ताची वाडी आश्रमशाळा येथून एक किलोमीटर अंतरावर असलेल्या अंबीवली येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात नेले. तेथे कोणीही वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचारी उपलब्ध नसल्याने सर्वांना कशेळे येथील ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आले. त्या सर्व विषबाधा झालेल्या मुलींवर कशेळे ग्रामीण रुग्णालयात तेथील अधीक्षक डॉ. पाटील यांनी परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन पहाटे आपल्या सर्व आरोग्य कर्मचाऱ्यांना बोलावून घेतले आणि उपचार सुरू केले.
विषबाधा झाल्याची माहिती एका विद्यार्थिनीने आपल्या घरी पहाटे कळविली. त्यावेळी पालकांनी कर्जत तालुका आदिवासी संघटनेचे पदाधिकारी जैतू पारधी, थोराड यांना माहिती देताच ते दोघे कशेळे येथे सकाळी पोचले. त्यांच्या उपस्थितीत विषबाधा झालेल्या सर्व मुलींवर अधिक लवकर उपचार करण्यात आले. दोन मुलींची प्रकृती सुधारली असून, त्यांना रुग्णालयातून सोडण्यात आले. (वार्ताहर)