ऐरोलीतील नाट्यगृहाच्या भूखंडाचा झाला तलाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 18, 2020 23:47 IST2020-12-18T23:47:17+5:302020-12-18T23:47:25+5:30
सहा वर्षे काम बंद; ५४ कोटी ४६ लाखांची फेरनिविदा

ऐरोलीतील नाट्यगृहाच्या भूखंडाचा झाला तलाव
नवी मुंबई : ऐरोली सेक्टर-५ येथील नाट्यगृहासाठी आरक्षित मोकळ्या भूखंडावर गेल्या ६ वर्षांपासून बांधकाम करण्यात न आल्याने, आता त्या भूखंडाला तलावाचे स्वरूप प्राप्त झाले आहे. पूर्वीच्या ठेकेदाराच्या आडमुठे धोरणामुळे ही वास्तू ठरावीक कालावधीत उभारण्यात महापालिकेच्या संबंधित विभागाला सपशेल अपयश आल्याचे ऐरोलीकरांना नाट्यगृहासाठी प्रतीक्षा करावी लागणार आहे.
नवी मुंबई महापालिकेचे वाशीत विष्णुदास भावे हे एकमेव नाट्यगृह आहे.या नाट्यगृहाबरोबरच ऐरोली परिसरातही एक नाट्यगृह असावे, यासाठी पालिकेने सहा वर्षांपूर्वी अद्ययावत असे नाट्यगृह उभारण्याच्या कामाला सुरुवात केली. ऐरोलीच्या मध्यभागी सेक्टर ५ येथील भूखंड क्रमांक ३७ वर २८९३.२९ क्षेत्रफळावर हे नाट्यगृह उभारले जात आहे. २०१४ मध्ये नाट्यगृहाच्या उभारणीला मे. महावीर रोड्स इन्फ्रास्ट्रक्चर प्रा. लि. कंपनीने सुरुवात केली. बांधकामासाठी मोठ्या प्रमाणात खड्डा खोदला. मात्र, त्यानंतर आर्थिक परिस्थिती चांगली नसल्याचे सांगत कंत्राटदाराने पुढे या नाट्यगृहाचे काम केलेच नाही. पालिकेने सहा वेळा नाट्यगृहाच्या उभारणीसाठी निविदा मागवल्या. प्रतिसाद न मिळाल्यामुळे सहा वर्षे काम रखडले आहे.
दोन मजल्याचे हे नाट्यगृह बांधण्यासाठी सहा वर्षांपूर्वी दोन ३३ कोटी रुपयांचा प्रस्ताव होता. आता चार मजल्याचे नाट्यगृह बांधण्यात येणार असून, त्यासाठी ५४ कोटी ४६ लाख रुपयांची ऑनलाइन फेरनिविदा मागविली आहे. येत्या दोन वर्षांत काम पूर्ण होण्याची शक्यता आहे.
- गिरीश गुमास्ते, कार्यकारी अभियंता, ऐरोली विभाग
या खड्ड्यात दोन वर्षांपूर्वी एका महिलेने मुलासहित आत्महत्या केली. त्यानंतर, आणखी एका महिलेनेने आत्महत्या केली. यावरून नाट्यगृहाच्या जागेवर असलेल्या खड्ड्यांची खोली लक्षात येते. नंतर त्या ठिकाणी चारही बाजूने ठिकठिकाणी पत्रे लावण्यात आले आहेत.
- संजय शेळके, अध्यक्ष, माऊली व्यापारी संकुल, ऐरोली