अन्यायाविरोधात प्रकल्पग्रस्तांची वज्रमूठ
By Admin | Updated: March 15, 2017 02:44 IST2017-03-15T02:44:12+5:302017-03-15T02:44:12+5:30
शासन, एमआयडीसी व सिडकोकडून ४५ वर्षे सातत्याने अन्याय केला जात आहे. आमची शंभर टक्के जमीन संपादित केली व आता घरांवर बुल्डोझर फिरविला जात आहे.

अन्यायाविरोधात प्रकल्पग्रस्तांची वज्रमूठ
नवी मुंबई : शासन, एमआयडीसी व सिडकोकडून ४५ वर्षे सातत्याने अन्याय केला जात आहे. आमची शंभर टक्के जमीन संपादित केली व आता घरांवर बुल्डोझर फिरविला जात आहे. आमच्या जमिनीवर आम्ही विस्थापित होत असून आता हे सहन केले जाणार नाही. नवी मुंबईमध्ये जर प्रकल्पग्रस्तांना सुखाने राहता येत नसेल, तर सरकारलाही आम्ही सुखाने राहू देणार नाही, असा इशारा प्रकल्पग्रस्तांनी दिला आहे. आता आश्वासन नाहीच जोपर्यंत सर्व प्रश्न सुटत नाहीत, तोपर्यंत उपोषण मागे घेतले जाणार नसल्याचा स्पष्ट इशाराही दिला आहे.
आगरी कोळी युथ फाउंडेशनच्या वतीने प्रकल्पग्रस्तांवर होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी कोकणभवन व सिडकोवर धडक मोर्चा काढण्यात आला. निर्णायक लढ्यात नवी मुंबई, पनवेल, उरण परिसरातून २५ हजारपेक्षा जास्त भूमिपुत्र सहभागी झाले होते. विशेष म्हणजे, या आंदोलनामध्ये महिलांचा सहभाग लक्षणीय होता. शासन, सिडको, महापालिका, एमआयडीसीकडून होत असलेल्या अन्यायाविरोधात दिलेल्या घोषणांनी परिसर दणाणून गेला होता. प्रलंबित मागण्यांचे फलक हातामध्ये घेऊन त्याकडे सर्वांचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला जात होता. उन्हाचा पारा ३४ अंशावर गेला असतानाही लहान मुलांसह वृद्ध नागरिकही मोर्चामध्ये सहभागी झाले व दिवसभर उपोषणाच्या ठिकाणी बसून होेते. अत्यंत शिस्तबद्धपणे काढण्यात आलेल्या मोर्चामध्ये सर्वपक्षीय राजकीय नेते व सामाजिक संघटनांचे पदाधिकारी सहभागी झाले होते. भाषणे न करता पोवाडे, कविता व मागण्यांचे फलक या माध्यमातून ४५ वर्षांचा अन्यायकारक प्रवास उलगडून दाखविण्यात आला. आता आश्वासने बास झाली. प्रत्यक्ष कृती हवी आहे. आम्ही शासनाकडे भीक मागत नाही, आमचा हक्क मागत आहोत व तो घेतल्याशिवाय माघार घेणार नसल्याचा इशाराही या वेळी देण्यात आला.
आंदोलनाचे तीन टप्प्यात नियोजन करण्यात आले आहे. किल्ले गावठाण ते कोकणभवनपर्यंत मोर्चा हा पहिला टप्पा. यामध्ये सिडको कार्यक्षेत्रातील सर्व प्रकल्पग्रस्त सहभागी झाले होते. आमरण उपोषण हा सर्वात प्रमुख टप्पा असून, यामध्ये आगरी कोळी युथ फाउंडेशनच्या तरुणांनी सहभाग घेतला आहे. आमरण उपोषणाबरोबर लाक्षणिक उपोषणाचेही आयोजन केले असून त्यामध्ये रोज प्रत्येक गावातील हजारो प्रकल्पग्रस्त सहभागी होणार आहेत. पहिल्या दिवशी दिवसभर भूमिपुत्र या ठिकाणी ठाण मांडून होते.
उन्हाचा पारा वाढल्यानंतरही गर्दी कायम होती. आंदोलनामध्ये राष्ट्रवादी काँगे्रसचे नेते गणेश नाईक, आमदार संदीप नाईक, माथाडी नेते नरेंद्र पाटील, भाजपा आमदार मंदा म्हात्रे, माजी खासदार संजीव नाईक, सागर नाईक, शिवसेनेचे नामदेव भगत, शिवराम पाटील, द्वारकानाथ भोईर, रोहिदास पाटील, उपनेते विजय नाहटा, काँगे्रसचे जिल्हा अध्यक्ष दशरथ भगत, अविनाश लाड, निशांत भगत, अंकुश सोनावणे, मंदाकिनी म्हात्रे, पूनम मिथुन पाटील, राष्ट्रवादीचे चंद्रकांत पाटील, शुभांगी पाटील व इतर नगरसेवक उपस्थित होते. (प्रतिनिधी)
तरूणाईचे शिस्तबद्ध नियोजन
प्रकल्पग्रस्तांच्या मोर्चाचे पूर्ण नियोजन तरूणांनी केले होते. एक महिन्यापासून गावबैठका, आमरण उपोषणासाठीचे कार्यकर्ते, लाक्षणिक उपोषणासाठीचे नियोजन व मुख्य मोर्चा शिस्तबद्धपणे पार पाडण्यासाठी प्रत्येक गोष्टीची काळजी घेण्यात आली होती. आंदोलनाच्या ठिकाणी भाषणे केली जाणार नसल्याने मागण्या सर्वांना समजाव्या यासाठी प्रत्येकाच्या हातामध्ये मागण्यांचे फलक देण्यात आले होते. भारूड, कविता व इतर मार्गाने ४५ वर्षांचा प्रवास मांडण्यात आला. मुख्य मोर्चा झाल्यानंतर मार्गावर स्वयंसेवकांनी स्वत: साफसफाई केली होती. वाहतुकीला अडथळा होणार नाही याचीही पूर्णपणे काळजी घेण्यात आली होती. आंदोलनासाठी आलेल्या सर्वांनीच तरूणांच्या नियोजनाचे कौतुक केले.
प्रकल्पग्रस्तांच्या लढ्यामध्ये सर्वपक्षीय नेत्यांनी पाठिंबा दिला आहे. राष्ट्रवादीचे नेते गणेश नाईक यांनी सर्वांना मोर्चा व उपोषणामध्ये सहभागी होण्याचे आवाहन केलेच, शिवाय स्वत: व सर्व पदाधिकाऱ्यांसह उपस्थित राहिले. भाजपा आमदार मंदा म्हात्रे यांच्या सहभागाविषयी शंका उपस्थित केली जात होती; पण प्रकल्पग्रस्तांच्या हितासाठी त्यांनीही आंदोलनामध्ये सहभाग घेतला. महापौर सुधाकर सोनावणे हे स्वत: किल्ले गावठाण ते सिडकोभवनपर्यंत चालत येऊन आंदोलकांचे मनोबल वाढविले. नवी मुंबईतील वकील संघटना, जेएनपीटी कामगार संघटना, नाभीक समाज संघटना, माथाडी कामगार, इंडियन सिटिझन फोरमनेही पाठिंबा दिला.
आमरण उपोषणात
सहभागी झालेले भूमिपुत्र
युथ फाउंडेशनचे अध्यक्ष नीलेश पाटील, युवा नेते वैभव तुकाराम नाईक, सुरज बाळाराम पाटील, गिरीश कान्हा म्हात्रे, घनश्याम मढवी, महेंद्र केशव भोईर, सतीश ज्ञानेश्वर भोईर, राजेश रमेश म्हात्रे, नितीन मेघनाथ पाटील, निकेतन पाटील, किशोर पाटील, हेमचंद्र म्हात्रे, ललिता शशिकांत म्हात्रे, सरला रेवनाथ भोपी, कोमल कैलास पाटील, विष्णू काशिनाथ भोपी, रोशन काळूराम भोईर, विजेंद्र यशवंत म्हात्रे, गणेश काशीनाथ भोपी, प्रशांत यशवंत पाटील, शशिकांत पाटील, तेजस यशवंत पाटील, प्रमोद मधुकर पाटील, अरूण त्रिंबक ठाकूर, हरिष सुभाष मढवी, मनोज यशवंत मेहेर, अॅड. निरंत वासुदेव पाटील, जितेश पंढरीनाथ पाटील, राजेश गजानन मढवी, श्रीकांत भगवान भोईर, योगेश बाळासाहेब गंधाकते, महेश विठ्ठल पाटील, मदन काशिनाथ मुकादम, संदीप रामदास पाटील, आदेश माणिक आगस्कर, अविनाश दत्तात्रेय पाटील, किरण नरेश पाटील, संदीप जनार्दन पाटील, राजेश लालचंद म्हात्रे, जितेन घरत, अनिकेत पाटील, भानुदास भोईर.