नाट्यगृह रखडविण्याचे नाटक
By Admin | Updated: March 3, 2016 02:52 IST2016-03-03T02:52:43+5:302016-03-03T02:52:43+5:30
ऐरोलीमध्ये ५४ कोटी रुपये खर्च करून बांधण्यात येणाऱ्या नाट्यगृहाचे काम रखडविण्याची नाटकबाजी सुरू आहे. काम पूर्ण करण्याची मुदत संपत आली तरी अद्याप पाया भरण्याचे कामही पूर्ण झालेले नाही

नाट्यगृह रखडविण्याचे नाटक
नवी मुंबई : ऐरोलीमध्ये ५४ कोटी रुपये खर्च करून बांधण्यात येणाऱ्या नाट्यगृहाचे काम रखडविण्याची नाटकबाजी सुरू आहे. काम पूर्ण करण्याची मुदत संपत आली तरी अद्याप पाया भरण्याचे कामही पूर्ण झालेले नाही. गतवर्षी अर्थसंकल्पात १५ कोटी ९६ लाख रुपयांची तरतूद केली, पण प्रत्यक्षात ३८ लाख रुपयांचेच काम केले असून पुढील वर्षीसाठीही फक्त १० कोटी रुपयांची तरतूद केली आहे.
नवी मुुंबईमध्ये विरोधी पक्षातील नगरसेवकांच्या प्रभागांमधील कामे रखडविली जात असल्याचा आरोप शिवसेना नगरसेवक करू लागले आहेत. ऐरोलीतील नगरसेवक एम. के. मढवी राष्ट्रवादी काँगे्रसमध्ये असताना त्यांच्या प्रभागात तब्बल ५४ कोटी रुपये खर्च करून नाट्यगृह बांधण्याचा निर्णय घेण्यात आला होता. २०१४ मध्ये नाट्यगृहाचे काम सुरू केले होते. एका वर्षामध्ये काम पूर्ण होणे आवश्यक होते, परंतु प्रत्यक्षात मात्र एक वर्षापासून काम ठप्प झाले आहे. महानगरपालिकेने २०१३ मध्ये २९ लाख ३७ हजार रुपये खर्च केले होते. पुढील २०१४ मध्ये ११ लाख ७७ हजार रुपये खर्च केले. गतवर्षी अर्थसंकल्पामध्ये तब्बल १५ कोटी ९६ लाख रुपयांची तरतूद केली होती. परंतु डिसेंबरपर्यंत फक्त ३८ लाख रुपये खर्च झाले आहेत. महापालिका निवडणुकीनंतर येथील काम थांबविण्यात आले आहे. मढवी यांनी शिवसेनेत प्रवेश केल्यामुळे हे काम थांबविले असल्याची चर्चा ऐरोलीमध्ये सुरू झाली आहे. सत्ताधारी व विरोधकांच्या राजकारणामध्ये ऐरोलीकरांचे मात्र नुकसान होऊ लागले आहे.
महापालिकेने २०१५ - १६ च्या अर्थसंकल्पामध्येही या कामासाठी फक्त १० कोटी रुपयांची तरतूद केली आहे. यामुळे यावर्षीही नाट्यगृहाचे काम रखडविण्यात येणार असल्याचे स्पष्ट होऊ लागले आहे. नवी मुंबई महानगरपालिका एकही प्रकल्प वेळेत पूर्ण करीत नाही. कामे वेळेत पूर्ण न झाल्यामुळे कामावरील खर्च प्रचंड वाढत आहे. यापूर्वी महापालिका मुख्यालय, वंडर्स पार्क, ठाणे-बेलापूर रोड, ऐरोली, नेरूळ, बेलापूरमधील रुग्णालये यांचा खर्च प्रचंड वाढला होता. ऐरोलीमधील नाट्यगृहाचे काम रखडवून या प्रकल्पाचा खर्चही वाढविण्याचे षड्यंत्र सुरू असल्याची शंका उपस्थित केली जात आहे.
महापालिकेकडे पैसे नव्हते तर या कामाचे भूमिपूजन का केले, असा प्रश्न नागरिक विचारू लागले आहेत. महापालिकेच्या सर्वसाधारण सभेसह वेळ पडली तर रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याचा इशारा शिवसेनेने दिला आहे.