जलस्रोत विकसित करण्याची योजना लालफितीत

By Admin | Updated: May 26, 2017 00:21 IST2017-05-26T00:21:24+5:302017-05-26T00:21:24+5:30

माथेरानमध्ये २७ जिवंत झरे असून, ब्रिटिश काळात या झऱ्यांचा माथेरानमध्ये पाणीपुरवठ्यासाठी वापर केला जात असे.

Plan for developing water resources rediff | जलस्रोत विकसित करण्याची योजना लालफितीत

जलस्रोत विकसित करण्याची योजना लालफितीत

कांता हाबळे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
नेरळ : माथेरानमध्ये २७ जिवंत झरे असून, ब्रिटिश काळात या झऱ्यांचा माथेरानमध्ये पाणीपुरवठ्यासाठी वापर केला जात असे. मात्र, काळाच्या ओघात या झऱ्यांची आणि विहिरींची दुरवस्था झाली. टंचाईच्या काळात या झऱ्यांच्या पाण्याचा वापर करता यावा आणि माथेरान डोंगरमाथ्यावरील पाण्याचे स्रोत विकसित व्हावेत, यासाठी माथेरान नगरपरिषदेची साडेतीन कोटींची पुनर्विकास योजना तीन वर्षांपासून तांत्रिक मंजुरीच्या प्रतीक्षेत आहे.
ब्रिटिश माथेरानला आले आणि त्यांनी हे ठिकाण पर्यटनस्थळ म्हणून विकसित करताना सुरुवातीच्या काळात डोंगरमाथ्यावर असलेल्या पाण्याच्या स्रोतांचा वापर करूनच येथील पाण्याची गरज पूर्ण केली. पुढे शार्लोट तलावाची निर्मिती झाली आणि १९५०मध्ये या तलावाची क्षमता अधिक वाढविण्यासाठी बंधारा तयार झाल्यानंतर माथेरानमधील पाण्याच्या नैसर्गिक स्रोतांकडे दुर्लक्ष झाले. सध्या माथेरानची दोन लाख लिटर पाण्याची गरज आहे. ही गरज भागविण्यास शार्लोट तलावातील पाणी कमी पडते म्हणून नेरळ येथील उल्हास नदीवरून माथेरानसाठी पाणी योजना झाली आहे. दोन हजार सहाशे फूट उंचीवर पाणी नेण्याची योजना आखताना डोंगरमाथ्यावरील पाण्याच्या स्रोतांकडे मात्र दुर्लक्ष करण्यात आले आहे.
माथेरान नगरपरिषदेने माथेरानमधील वारसा स्थळांची (हेरिटेज) यादी करताना या नैसर्गिक झऱ्यांचा नैसर्गिक वारसा यादीत समावेश केला आहे. डेंजर पाथ झोनमध्ये टाकी स्प्रिंग, इन स्प्रिंग, फाउंटन लॉज बंगल्याजवळील विहीर, उखळी स्प्रिंग व गायन स्प्रिंग या नैसर्गिक स्रोतांचा समावेश आहे. तर पॅनोरमा पॉइंट झोनमध्ये घाट स्प्रिंग आणि एका विहिरीचा समावेश आहे. गार्बेट पॉइंट झोनमध्ये बांबूचे स्प्रिंग आणि ब्लॅक वॉटर स्प्रिंगचा समावेश आहे. याशिवाय जंगल स्प्रिंग, धनगरवाडा स्प्रिंग, मंकी स्प्रिंग मालडुंगा झोनमध्ये नाला स्प्रिंग, पॉन्सबॉय स्प्रिंग, मॅलेट स्प्रिंग, रिप स्प्रिंग आणि एल्फिन्स्टन लॉज बंगल्याजवळच्या विहिरीचा नैसर्गिक पाणी स्रोतांमध्ये समावेश आहे.
गळती धारा झोनमध्ये हॅरीसन्स स्प्रिंग, पेमास्तर वेल तर बाजार झोनमध्ये कुली स्प्रिंग तर लुईझा पॉइंट झोनमध्ये अंबा स्प्रिंग आणि वॉकर्स टँक या स्रोतांचा समावेश आहे.
या नैसर्गिक स्रोतांपैकी इंदिरा गांधीनगर येथील पेमास्टर वेल ही १९२३ साली लेफ्टनंट कर्नल पेमास्टर यांनी बांधली आहे. या विहिरीतून वसाहतीला पाणीपुरवठा केला जात असे. मात्र, अलीकडच्या काळात या विहिरींची दयनीय अवस्था झाली आहे. ही विहीर व्यवस्थित केल्यास मुबलक पाणी उपलब्ध होऊ शकेल, याच विहिरीपासून २०० मीटर अंतरावर नायर पॉइंट या प्रेक्षणीय स्थळाजवळ हॅरीसन्स स्प्रिंग आसुंये झऱ्यावर १८६५ मध्ये अवघे दोन हजार आठशे रुपये खर्चून एक पाण्याची टाकी बांधण्यात आली होती. पुढच्या दीडशे वर्षांत मात्र काही झाले नाही.

सीम्सन टँक
च्माथेरानच्या दस्तुरी भागात वन उद्यानाजवळ सीम्सन टँक नावाचे छोटे धरण आहे. वाहून येणारी माती आणि गाळात हे धरण रु तले आहे. साडेचारशे दशलक्ष लिटर पाण्याची या धरणाची क्षमता आहे. याठिकाणी धरण उभारून माथेरानच्या पाण्याची गरज भागविता येईल हा विचार माथेरानचा शोध लावल्यानंतर अवघ्या आठ वर्षांत म्हणजे १८५८ मध्ये लॉर्ड एल्फिस्टन यांच्या कल्पनेतून पुढे आला आणि पुढे १८७५मध्ये हे धरण बांधून पूर्ण झाले. सध्या या धरणात मोठ्या प्रमाणात गाळ साचला आहे. धरणाची मालकी माथेरान नगर परिषदेकडे आहे. मात्र नगरपरिषदेला त्याच्याशी काही घेणे-देणे नाही. मालवाहतूक करणारे घोडे या धरणात धुतले जातात, तसेच अनेकदा मेलेले घोडेही या धरणाच्या परिसरातच गाडले जातात. या धरणाची दुरु स्ती झाल्यास पिण्याच्या पाण्याची सोय होणे, तसेच एक देखणे प्रेक्षणीय स्थळ येथे साकारले जाऊ शकेल.

विहिरीचा विसर
माथेरानमधील श्रीराम मंदिरामागे एक बोअरवेल होती. बाजारपेठेतील नागरी भागाला या विहिरीतून पाणीपुरवठा व्हायचा. मात्र, आता ही बोअरवेलदेखील विस्मृतीमध्ये गेली आहे. अमन लॉज रेल्वे स्थानकाजवळ अशीच एक विहीर अनास्थेच्या गर्तेत सापडली आहे.

मॅलेट स्प्रिंग अनास्थेच्या गर्तेत
सनसेट पॉइंटकडे जाणाऱ्या रस्त्यावर अखंड वाहणाऱ्या या झऱ्याला माथेरानचा शोध लावणाऱ्या ह्यूज मॅलेट यांचे नाव देण्यात आले आहे. पूर्वी माथेरानला येणारे अनेक बंगलेधारक याच झऱ्याचे पाणी प्यायचे. मात्र, अलीकडे या झऱ्याकडे सपशेल दुर्लक्ष झाले आहे. या झऱ्यावर एखादा बाटलीबंद पाण्याचा प्रकल्प उभारल्यास बाहेरून येणाऱ्या प्लास्टिक बाटल्यांचा प्रश्न मिटून स्थानिक पातळीवर रोजगारनिर्मिती होऊ शकेल.


माथेरान नगरपरिषदेने जलस्रोतांच्या संवर्धनाची योजना करून तांत्रिक मंजुरीसाठी पाठविली आहे. २७ जलस्रोतांपैकी मॅलेट स्प्रिंग, पेमास्टर वेल, सिम्प्सन टँकसह सात जलस्रोतांची प्राधान्याने दुरुस्ती व संवर्धन करण्याची योजना आहे. नेहमीच्या कामापेक्षा हे काम वेगळे असल्याने त्यातील कामाच्या दराबाबत डीएसआरमध्ये उल्लेख नसल्याने या प्रस्तावास मंजुरी मिळण्यास विलंब होत आहे. मात्र, यातील त्रुटी दूर करून तांत्रिक मान्यता मिळविण्याचे नगरपरिषदेचे प्रयत्न सुरू आहेत.
-देवेंद्र मोरखंडीकर, अभियंता
तेराव्या वित्त आयोगातून निधी उपलब्ध करून माथेरानमधील या प्रस्तावित जलस्रोतांचे संवर्धन आणि दुरुस्तीचा प्रस्ताव नगरपरिषदेने चार वर्षांपूर्वी मंजूर केला आहे. कामासाठी सुमारे साडेतीन कोटी रु पये खर्च अपेक्षित आहे. एमएमआरडीएच्या हेरीटेज सोसायटीकडून यासाठी शंभर टक्के निधी उपलब्ध होऊ शकेल. मात्र, त्यासाठी तांत्रिक मंजुरी आवश्यक आहे.
- अजय सावंत, माजी नगराध्यक्ष माथेरान
हॅरिसन स्प्रिंग घोड्याची लीद आणि गाळाने भरून गेला होता. आम्ही तरु णांनी ते श्रमदानाने साफ केले. आता तिथे पाणी साचले असून परिसरातील महिला त्याचा वापर करतात. पेमास्टर वेल या विहिरीतून आमच्या भागाला पाणीपुरवठा व्हायचा. मात्र, गेल्या १५ वर्षांत हे बंद झाले आहे. इंदिरानगर वसाहतीच्या दृष्टीने या दोन्ही पाण्याच्या नैसर्गिक स्रोतांचे महत्त्व असून त्याचा देखभालीकडे लक्ष देण्याची गरज आहे.
- चंद्रकांत सुतार,
स्थानिक नागरिक

Web Title: Plan for developing water resources rediff

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.