कलानी यांच्या विरोधात याचिका
By Admin | Updated: January 7, 2015 02:00 IST2015-01-07T02:00:35+5:302015-01-07T02:00:35+5:30
राष्ट्रवादीच्या आमदार ज्योती कलानी यांनी निवडणूक नामांकन अर्जात महत्वपूर्ण माहिती दडवून ठेवल्याचा आणि बनावट कागदपत्र सादर केल्याचा आरोप इंदर भटीजा यांनी केला आहे.

कलानी यांच्या विरोधात याचिका
उल्हासनगर : राष्ट्रवादीच्या आमदार ज्योती कलानी यांनी निवडणूक नामांकन अर्जात महत्वपूर्ण माहिती दडवून ठेवल्याचा आणि बनावट कागदपत्र सादर केल्याचा आरोप इंदर भटीजा यांनी केला आहे. या संदर्भात त्यांनी न्यायालयात याचिका दाखल केली आहे.
भटीजा हत्याकांडाप्रकरणी पप्पू कलानी यांना जन्मठेपेची शिक्षा झाली आहे. हत्याकांडातील साक्षीदार व भाटिजा यांचा भाऊ कमल भटीजा यांनी ही याचिका दाखल केली आहे. याचिकेत २२ हरकती घेतल्या आहेत. कालानी या ‘शहिद दुलिचंद तेजुमल कालानी मेमोरीयल ट्रस्ट’च्या अध्यक्ष असून संस्थेने ही जागा महापालिकेकडून १९९० साली भाडेतत्त्वावर घेतली होती. संस्थेने परवानगी शिवाय महाविद्यालयाच्या इमारतीवर तीन मजले चढविले आहे. कलानी यांचा मुलगा, सुन, मुली संस्थेच्या पदाधिकारी आहेत. एका घरातील तीन पेक्षा जास्त व्यक्ती संस्थेत नसाव्यात, या नियमाचा भंग झाला आहे.
त्या सीमा कन्स्ट्रक्शन व सीमा रिसॉर्ट कंपनीत भागीदार असून कंपनीने अद्यापही प्राप्तिकर परताव्याचा दंड भरलेला नाही. तसेच कंपनीचा पत्ता निवडणुक नामांकन अर्जात नमूद केलेला नाही. कालानी यांच्याकडे सात वाहने असून त्यांचा स्थानिक कर भरलेला नाही. येरवडा, कोपरीत खटले प्रलंबित असताना त्याचा उल्लेखही अर्जात केलेला नाही. आदी २२ हरकती कमल भटीजा यांनी घेतल्या आहेत. (प्रतिनिधी)
न्यायालयात निवडणूक नामांकन याचिका दाखल केल्याचे कळले. यापूर्वीही असे आरोप फेटाळण्यात आले आहेत. वेळेवर योग्य ती माहिती न्यायालयाला सादर करणार असुन आमदार पदाला कोणताही धोका नाही, अशी प्रतिक्रिया आमदार ज्योती कलानी यांनी दिली.