स्वच्छ भारत अभियानासाठी पेण पालिका सज्ज
By Admin | Updated: October 5, 2015 00:27 IST2015-10-05T00:27:41+5:302015-10-05T00:27:41+5:30
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरु केलेल्या भारत स्वच्छ अभियानाला एक वर्ष झाले असून २ आॅक्टोबर २०१९ पर्यंत हे स्वच्छता अभियान पूर्ण करुन भारत

स्वच्छ भारत अभियानासाठी पेण पालिका सज्ज
पेण : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरु केलेल्या भारत स्वच्छ अभियानाला एक वर्ष झाले असून २ आॅक्टोबर २०१९ पर्यंत हे स्वच्छता अभियान पूर्ण करुन भारत स्वच्छ व आरोग्यदायी बनविण्याचे उद्दिष्ट परिपूर्ण करण्यासाठी पेण नगरपालिका प्रशासन सज्ज झाले आहे.
स्वच्छता अभियानांतर्गत पेण पालकेने वैयक्तिक शौचालय बांधणीसाठी धडक मोहीम हाती घेतली असून केंद्र व राज्य शासनाच्या १२ हजार आर्थिक अनुदानात पालिका प्रशासनाने नगरपालिका फंडातून तीन हजार रुपये तर १४ व्या वित्त आयोगातून पाच हजार रुपये असे आठ हजार रुपये प्रोत्साहनपर अनुदान मंजूर करुन शौचालय बांधणीसाठी २० हजार रुपये मंजूर करणारी पेण पालिका ‘क’ वर्ग नगर पालिकेत अग्रणी ठरली आहे. शौचालय बांधणीसाठी आलेल्या २०६ अर्जांपैकी पहिल्या टप्प्यातील ८८ लाभार्थ्यांच्या बँक अकाऊंटमध्ये ही रक्कम पालिका प्रशासनाने वर्ग केली असून या लाभार्थीना शौचालय बांधणीचे मंजुरी पत्रकाचे वाटप नगराध्यक्षा प्रितम पाटील व गटनेते अनिरुध्द पाटील यांच्या उपस्थितीत स्वच्छता अभियानाच्या मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला.
२५ सप्टेंबर ते ११ आॅक्टोबर २०१५ पर्यंत १६ दिवस हे अभियान राबविण्याचा कार्यक्रम सुरु आहे. याबाबत जनजागृती करण्यासाठी पेण नगरपालिका मुख्याधिकारी जीवन पाटील व आरोग्य अधिकारी दयानंद गावंड यांनी शनिवारी पेण नगरप्रशासनाच्या ९ शाळांमधील ३५० शालेय विद्यार्थ्यांची स्वच्छता विषयक जनजागृतीची रॅली पेण शहरात काढली. या वेळी विद्यार्थ्यांकडून स्वच्छ शहर, सुंदर शहर, आरोग्यदायी शहरासाठी या स्वच्छता अभियानात नागरिकांनी घर, कॉलनी, परिसरात स्वच्छतेसाठी दक्षता घ्यावी असा संदेश देण्यात आला.
शहरातून तब्बल दोन तास या विद्यार्थ्यांनी घोषणाद्वारे चांगली जनजागृती केली. यावेळी मुख्याधिकारी जीवन पाटील यांनी या कार्यक्रमाअंतर्गत नागरिकांनी पुढे येवून आपला विभाग व आपला परिसर स्वच्छ ठेवावा, कचरा घंटागाडीमध्ये वेळेप्रमाणे टाकावा, गटारांमध्ये कचरा टाकू नये. आपले शहर स्वच्छ ठेवण्यासाठी प्रशासनाला सहकार्य करावे, आपल्या काही तक्रारी असतील तर त्याबाबत माझ्याशी संपर्क साधावा असे आवाहन जीवन पाटील यांनी केले.
या अभियाना अंतर्गत निबंध स्पर्धा, चित्रकला स्पर्धा, या शिवाय स्वयंसेवी संस्थांद्वारे स्वच्छता उपक्रमावर भर देणार असल्याची माहिती पेण पालिका सूत्रांनी दिली. (वार्ताहर)