तज्ज्ञांअभावी रुग्णांची हेळसांड

By Admin | Updated: October 15, 2016 07:02 IST2016-10-15T07:02:09+5:302016-10-15T07:02:09+5:30

स्त्रीरोग तज्ज्ञाच्या अनुपस्थितीमुळे गरोदर महिलांची गैरसोय होत असल्याच्या कारणावरुन मनसे कार्यकर्त्यांनी ऐरोलीतील पालिका रुग्णालयावर धडक

Patients neglected due to expertise | तज्ज्ञांअभावी रुग्णांची हेळसांड

तज्ज्ञांअभावी रुग्णांची हेळसांड

नवी मुंबई : स्त्रीरोग तज्ज्ञाच्या अनुपस्थितीमुळे गरोदर महिलांची गैरसोय होत असल्याच्या कारणावरुन मनसे कार्यकर्त्यांनी ऐरोलीतील पालिका रुग्णालयावर धडक दिली. यावेळी नियुक्ती होऊनही कर्तव्यावर हजर न राहणाऱ्या वैद्यकीय अधिकाऱ्यांची खुर्ची दालनाबाहेर मांडून आंदोलन करण्यात आले. कोट्यवधी खर्चून उभारलेल्या रुग्णालयात सुविधाच मिळत नसल्याचा संताप रुग्णांनी व्यक्त केला.
महापालिकेच्या वतीने ऐरोली येथे बांधण्यात आलेल्या रुग्णालयात डेंग्यू, मलेरियाच्या चाचणीसाठी गेलेल्या रुग्णांना तासभर थांबवल्यानंतर ऐनवेळी वाशीच्या रुग्णालयात पाठवले जात आहे. याठिकाणी गरोदर महिलांचीही हेळसांड होत असल्याची तक्रार मनसे उपशहर अध्यक्ष नीलेश बानखेले यांना प्राप्त झाली होती. त्यानुसार मनसे शहर अध्यक्ष गजानन काळे यांच्या मार्गदर्शनाखाली बानखेले यांनी शुक्रवारी सकाळी रुग्णालयाला भेट दिली. एकही तज्ज्ञ उपस्थित नसल्याने वैद्यकीय अधिकाऱ्याची खुर्ची दालनातून रुग्णालयाबाहेर मांडून त्यांनी आंदोलन केले.
रुग्णालयात सद्यस्थितीला एकच स्त्रीरोग तज्ज्ञ आहेत. त्यांच्या कामाची वेळ संपल्यानंतर पर्यायी स्त्रीरोग तज्ज्ञ उपलब्ध नसतात. यादरम्यान एखादी महिला प्रसूतीसाठी दाखल झाल्यास तिला वाशी रुग्णालयात पाठवले जाते. अनेकदा वाशीला गेलेल्या गरोदर महिलांना त्याठिकाणी दाखल करुन न घेता परत पाठवले जात असल्याचाही आरोपही यावेळी करण्यात आला. शिवाय काही महिलांची वाशी रुग्णालयात प्रसूती केल्यानंतर काही तासातच त्यांना नवजात बालकासह ऐरोली रुग्णालयात हलवले जाते. या प्रकारातून महिलेसह तिच्या बालकाच्या जिवाशी खेळण्याचे काम पालिकेचा आरोग्य विभाग करत असल्याने रुग्णांमधून संताप व्यक्त होत आहे. सुविधा मिळणार नसतील तर रुग्णालये उभारली कशाला असा प्रश्न बानखेले यांनी उपस्थित केला. याप्रकरणी बानखेले यांच्यासह चंद्रकांत सोनावणे व इतर मनसे कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल केला आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Patients neglected due to expertise

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.