पनवेल : राष्ट्रभावना, संघटन आणि देशाच्या विकासासाठी सदैव कार्यरत असलेली भारतीय जनता पार्टी हे एक देशाची सेवा करणारे कुटुंब आहे. या कुटुंबातील सदस्य होऊन देशाच्या विकासात योगदान द्यावे, त्यासाठी ‘भाजप संघटन पर्व २०१९’ हे अभियान राबविण्यात येत असून, जास्तीत जास्त नागरिकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन भाजपचे राष्ट्रीय सदस्य सहप्रमुख डॉ. अरुण चतुर्वेदी यांनी येथे पार पडलेल्या पत्रकार परिषदेत केले.
परिषदेस महाराष्ट्र प्रदेश सचिव व महाराष्ट्र अभियानप्रमुख संजय उपाध्याय, सिडकोचे अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, कोकण म्हाडाचे सभापती बाळासाहेब पाटील, महापौर डॉ. कविता चौतमोल, भाजपचे तालुकाध्यक्ष अरुण भगत, शहराध्यक्ष जयंत पगडे, जिल्हा संघटन सरचिटणीस श्रीनंद पटवर्धन, उपमहापौर विक्रांत पाटील, विधानसभा विस्तारक अविनाश कोळी आदी उपस्थित होते.
लोकसभा निवडणुकीत मिळालेले यश, त्या अनुषंगाने सदस्य संख्येत वाढ करण्याचा संकल्प संघटन पर्वाच्या माध्यमातून करण्यात आला असून, राज्यातून ५० लाख सदस्य करण्याचा संकल्प करण्यात आल्याची माहिती चतुर्वेदी यांनी दिली. ज्या ठिकाणी संघटन कमकुवत आहे, तिथे विशेष लक्ष देणार असल्याचे त्यांनी सांगितले.