अर्धवट कामाचा प्रवाशाला फटका
By Admin | Updated: February 20, 2016 02:05 IST2016-02-20T02:05:17+5:302016-02-20T02:05:17+5:30
रेल्वे प्रशासनाच्या निडी थांब्यावर काम सुरू असून ते अत्यंत धीम्या गतीने सुरू आहे. याच अर्धवट कामाचा एका प्रवाशाला फटका बसला असून त्यामुळे त्यांना आपल्या पायाचा पंजा गमवावा लागला आहे.

अर्धवट कामाचा प्रवाशाला फटका
रोहा : रेल्वे प्रशासनाच्या निडी थांब्यावर काम सुरू असून ते अत्यंत धीम्या गतीने सुरू आहे. याच अर्धवट कामाचा एका प्रवाशाला फटका बसला असून त्यामुळे त्यांना आपल्या पायाचा पंजा गमवावा लागला आहे.
सदानंद खरीवले (रा. भातसई ) असे या प्रवाशाचे नाव आहे. निडी येथील नव्या प्लॅटफार्मवरील सिमेंट ब्लॉकच्या अर्धवट कामामुळे खोल खड्ड्यात सदानंद खरीवले यांचा गाडीतून उतरताना डावा पाय अडकला. क्षणार्धात पायावरून गाडी गेल्याने त्यांना पायाचा पंजा गमवावा लागल्याची गंभीर घटना घडली आहे. त्यांना वेळेत पाय बाहेर काढता न आल्याने त्यांच्या पायावरून रेल्वे गेली. त्यात गंभीर जखमी झाल्याने खरीवले यांना तातडीने खाजगी रु ग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र त्यानंतर रोहा ग्रामीण रुग्णालयात आणले. पुन्हा त्यानंतर मुंबई येथे अधिक उपचारार्थ हलविण्यात आले.
निडी रेल्वे थांब्याचे काम सुरू आहे. तसेच त्या कामांतील त्रुटी व अर्धवटपणा मुख्यत: सिमेंट ब्लॉक खड्डे अनेक प्रवाशांच्या जिवावर बेतत आहेत. महत्वाचे म्हणजे निडी थांब्यावर वीज नाही. त्यामुळे अंधारात चाचपडत गाडीत चढावे लागत आहे. उतरताना प्रवाशांना कायम हा धोका पत्करावा लागत आहे. याच रेल्वे प्रशासनाच्या हलगर्जीपणाने सदानंद खरीवले यांना पाय गमवावा लागला. थांब्यावर वीज नसल्यानेही हा प्रकार घडला असल्याचेही इतर प्रवाशांनी सांगितले.