आयुक्तांच्या बदलीमुळे पनवेलकर नाराज
By Admin | Updated: March 17, 2017 06:02 IST2017-03-17T06:02:03+5:302017-03-17T06:02:03+5:30
महापालिकेचे पहिले आयुक्त सुधाकर शिंदे यांनी सहा महिन्यांमध्ये शहराचा चेहरा बदलला होता. रस्ते, पदपथावरील अतिक्रमणे हटविली.

आयुक्तांच्या बदलीमुळे पनवेलकर नाराज
मयूर तांबडे , पनवेल
महापालिकेचे पहिले आयुक्त सुधाकर शिंदे यांनी सहा महिन्यांमध्ये शहराचा चेहरा बदलला होता. रस्ते, पदपथावरील अतिक्रमणे हटविली. स्मार्ट सिटीच्या दिशेने शहराची वाटचाल सुरू झाली होती. पण अचानक शासनाने त्यांची बदली केल्याने शहरवासीयांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. बदलीचा शहराच्या विकासावर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली आहे.
१ आॅक्टोबर २०१६ रोजी पनवेल महानगरपालिकेची स्थापना झाल्यानंतर सुधाकर शिंदे यांची आयुक्तपदावर नियुक्ती झाली. पहिल्या दिवसापासून त्यांनी कामाचा धडाका सुरू केला. बेकायदा हातगाड्या, बॅनरबाजी, अनधिकृत बांधकाम यावर आयुक्तांनी मोठ्या प्रमाणात कारवाई करत पनवेल शहर व आजूबाजूच्या परिसराला स्वच्छ केले होते. अनधिकृत बॅनर लावणाऱ्यांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले. शहर पहिल्यांदा होर्डिंगमुक्त झाल्याने शहरवासीयांनी समाधान व्यक्त केले होते. पनवेलमधील सर्व प्रमुख रस्ते व पदपथावर फेरीवाल्यांनी अतिक्रमण केले होते. महामार्गावरही रोडच्या बाजूलाही अनधिकृत बांधकाम व फेरीवाल्यांनी अतिक्रमण केले होते. आयुक्तांनी सरसकट सर्व अतिक्रमणे हटविली. पहिल्यांदा रस्ते व पदपथ मोकळे दिसू लागले होते. फक्त अतिक्रमणांवर कारवाई नाही तर भविष्याचा वेध घेवून महापालिकेच्या सर्व विभागांची रचना करण्यास सुरवात केली होती. १२०० कोटी रूपये उत्पन्नाचा आराखडा तयार केला होता. शहर हागणदारीमुक्त करण्यातही यश मिळविले होते. स्मार्ट सिटीच्या दिशेने शहराची वाटचाल सुरू असताना अचानक आयुक्तांची बदली केल्यामुळे नागरिकांना धक्का बसला आहे.
महापालिकेची निवडणूक एप्रिल -मे दरम्यान होणार असण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. आयुक्त सुधाकर शिंदे सत्ताधारी पक्षातील एका मंत्र्याचे भाऊ असल्याने महापालिकेची निवडणूक नि:पक्षपाती वातावरणात पार पडावी यासाठी आयुक्त सुधाकर शिंदे यांची बदली करण्याची मागणी केली जात होती. दुसरीकडे आयुक्तांनी सुरू केलेल्या धडक कारवाईचा फटका निवडणुकीत बसण्याची शक्यता असल्याने त्यांच्या बदलीसाठी प्रयत्न सुरू होते.
शिंदेंची बदली; मुंढेंना काअभय ?
पनवेलचे आयुक्त सुधाकर शिंदे यांच्या बदलीविषयी नवी मुंबईचे महापौर सुधाकर सोनावणे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र पाठवून शासन पक्षपातीपणे वागत असल्याबद्दल नाराजी व्यक्त केली आहे. शिंदे यांनी सहा महिन्यांमध्ये पनवेलचा चेहरा बदलला होता. तेथील फेरीवाले, अतिक्रमणावर कारवाई केली होती. सर्वांना विश्वासात घेवून काम करत होते. पण महापालिका निवडणुकीमध्ये त्यांच्या निर्णयांचा भाजपाला फटका बसण्याची शक्यता असल्यानेच त्यांची बदली केली. परंतु नवी मुंबईचे आयुक्त तुकाराम मुंढे यांच्याविरोधात अविश्वास ठराव दाखल केल्यानंतरही त्यांची बदली केली जात नाही. राष्ट्रवादीवर राजकीय सूड उगविण्यासाठीच मुंढे यांना अभय दिले जात असल्याबद्दल त्यांनी नाराजी व्यक्त केली.
पनवेल महानगरपालिकेच्या पहिल्या निवडणुकीचे आव्हान आहे. त्याच्या कामाला प्राधान्य देऊन मतदार याद्या अचूक व दोषरहित बनवणे हे माझे पहिले काम असेल. त्यानंतर निवडणूक अधिसूचना निघाल्यावर निवडणूक अधिकारी व त्यासंबंधीची कामे करण्यात येतील असे नवीन महापालिका आयुक्त राजेंद्र निंबाळकर यांनी पदभार सांभाळल्यावर बोलताना सांगितले. निवडणुकीचा फायदा घेऊन अनधिकृत बांधकाम करण्याचा प्रयत्न केला जातो त्याकडे लक्ष ठेवून त्याला प्रतिबंध केला जाईल. नवीन महापालिकेचे उत्पन्नाचे स्रोत लक्षात घेऊन उत्पन्न वाढवण्याकडे लक्ष देण्यात येईल . महापालिकेने यापूर्वी हाती घेतलेली विकासकामे पूर्ण केली जातील. हे सर्व आमचे टीम वर्क आहे. महापालिकेचे नवीन पदाधिकारी येईपर्यंत आमची जबाबदारी असल्याने ती आम्ही पूर्ण करू. नवीन कर्मचारी शासनाकडून मंजूर करण्यासाठी व सिडकोकडील हस्तांतरण प्रक्रि या पूर्ण करण्याची प्रक्रिया सुरू राहील, असे त्यांनी सांगितले.