पनवेलकरांवर वाढला अकृषिक कराचा बोजा
By Admin | Updated: March 18, 2017 04:06 IST2017-03-18T04:06:04+5:302017-03-18T04:06:04+5:30
तालुक्यातील सिडको नोडमधील रहिवाशांना अकृषिक कर भरण्यासंदर्भात पनवेल तहसील कार्यालयातून गेल्या महिना-दीड महिन्यांपासून नोटिसा पाठण्यिात येत आहेत.

पनवेलकरांवर वाढला अकृषिक कराचा बोजा
- वैभव गायकर, पनवेल
तालुक्यातील सिडको नोडमधील रहिवाशांना अकृषिक कर भरण्यासंदर्भात पनवेल तहसील कार्यालयातून गेल्या महिना-दीड महिन्यांपासून नोटिसा पाठण्यिात येत आहेत. हा कर न भरल्यास रहिवाशांना कारवाईला सामोरे जावे लागणार असल्याचेही यात नमूद करण्यात आल्याने रहिवासी संभ्रमात आहेत.
पनवेल तहसील कार्यालयामार्फत जवळपास साडेनऊ हजार नागरिकांना अशा प्रकारच्या नोटिसा पाठविण्यात आल्या आहेत. खारघर, कळंबोली, खांदा वसाहत, नवीन पनवेल, कामोठे आदी ठिकाणच्या रहिवासी संकुलांचा यात समावेश आहे. सिडकोने याठिकाणचे भूखंड ६० वर्षांच्या भाडेकरारावर दिले आहेत. आजही संबंधित जमिनीचे मालक सिडको प्राधिकरण आहे. सिडको नोडमध्ये कोणत्याही प्रकारचे बांधकाम करताना सिडकोकडून रीतसर परवानगी घ्यावी लागते. त्यामुळे संबंधित अकृषिक कर तहसील कार्यालयाने सिडकोकडून वसूल करावा, अशी मागणी पनवेल नगरपरिषदेचे माजी नगराध्यक्ष संदीप पाटील यांनी तहसीलदारांकडे केली आहे. यासंदर्भात त्यांनी तहसीलदार दीपक आकडे यांना निवेदन देऊन सदर नोटिसा रद्द करण्याची मागणी केली होती. मात्र त्यानंतरही नोटिसांचे सत्र सुरू असल्याने कारवाईच्या भीतीपोटी रहिवाशांनी कर भरण्यास सुरुवात केली आहे.
तहसील कार्यालयाच्या महसुलात अकृषिक कराच्या रूपात २० लाख रुपये जमाही झाले आहेत. सिडको नोडमधून सुमारे १ कोटी ७१ लाख रुपये एकूण अकृषिक कर तहसील कार्यालयालयाला प्राप्त होणार आहे.
सिडको नोडमधील अकृषिक करासंदर्भात रहिवाशांना नोटिसा पाठवून ६० दिवसांत हा कर भरण्याच्या सूचना दिल्या आहेत. संबंधित कालावधीत हा कर न भरल्यास नियमानुसार कारवाई केली जाईल.
- बी. टी. गोसावी,
नायब तहसीलदार
अकृषिक कराला आमचा विरोध आहे. यासंदर्भात मुख्यमंत्र्यांकडे निवेदनही दिले आहे. जागेचा मूळ मालक सिडको आहे. संबंधित जागेचा एनए सिडकोने केला असल्याने सिडकोकडून संबंधित कर वसूल होणे अपेक्षित आहे. यासंदर्भात रहिवाशांना पत्र पाठवून संबंधित कर न भरण्याबाबत पत्र पाठवले आहे.
- प्रशांत ठाकूर, आमदार