पनवेल, उरणमधील पारंपरिक मासेमारी संकटात
By Admin | Updated: February 6, 2017 04:46 IST2017-02-06T04:46:14+5:302017-02-06T04:46:14+5:30
जगभरात अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि साधनांचा वापर करून मोठ्या प्रमाणात मासेमारी केली जात असली तरी नवी मुंबई, पनवेल, उरण भागात पिढ्यान्पिढ्या

पनवेल, उरणमधील पारंपरिक मासेमारी संकटात
उरण : जगभरात अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि साधनांचा वापर करून मोठ्या प्रमाणात मासेमारी केली जात असली तरी नवी मुंबई, पनवेल, उरण भागात पिढ्यान्पिढ्या पारंपरिक साधनांचा वापर करून अद्यापही समुद्र किनारपट्टी, खाड्यांमध्ये हजारो मच्छीमार पूर्वापार पद्धतीने मासेमारी करून आपल्या कुटुंबियांचा उदरनिर्वाह चालवितात. मात्र ठिकठिकाणी समुद्रात होत असलेला माती दगडांचा भराव, किनारपट्टी आणि खाड्या कंपन्यांच्या रसायनमिश्रित सांडपाण्याने प्रदूषित झाल्या आहेत. यामुळे मासळी मिळणे कठीण झाल्याने पारंपरिक मासेमारी करणाऱ्या हजारो मच्छीमारांवर उपासमारीची वेळ आला आहे.
नवी मुंबई परिसरासह उरण, पनवेल तालुक्यात सुमारे सहा बाजार मच्छीमार पारंपरिक पद्धतीने मासेमारी करून आपल्या कुटुंबियांचा उदरनिर्वाह करतात. त्यामध्ये उरण, पनवेल तालुक्यातील हनुमान कोळीवाडा, शेवा, न्हावा, गव्हाण, बेलपाडा, मुळेखंड, करंजा, मोरा, दिघोडे, खोपटा, केगाव-दांडा, घारापुरी आदि गावातील हजारो मच्छिमार कुटुंबियांचा समावेश आहे. त्याव्यतिरिक्त अरबी समुद्राच्या खाडी किनाऱ्यावर अनेक गावे वसलेली आहेत.
विस्तीर्ण पसरलेल्या खाड्या, विपुल खाजण जमीन, खाडी किनाऱ्यावर पसरलेली तिवरांची जंगले, मड प्लॉट, प्रवाळाने भरलेले खडक, वाळुकामय गुहा, खडकातीली खाचखळगे म्हणजे मत्स्यसंवर्धन मत्स्योत्पादन आणि माशांच्या प्रजोत्पादनासाठी सुरक्षित नैसर्गिक क्षेत्रच होय. सर्वच मोसमात विविध जातीचे रुचकर मासे विपुल प्रमाणात मिळत असल्याने पूर्वापार पारंपारिक मासेमारी व्यवसाय चांगलाच फोफावला आहे.
समुद्र खाड्यांमध्ये मच्छिमार आकडी, बगळी, भाला, आसू, झोळणे, पाग, वावरी, विळा, गळ, वाणे, खांदा, जाळी, डोल, फग अशा विविध पारंपरिक साधनांचा वापर अधिक करतात. या पारंपारिक साधनांचा उपयोग करीत यांत्रिक, बिगर यांत्रिक होड्यांच्या आधारावर मासेमारी व्यवसाय करीत असतात. अशा मासेमारीतून निवटे, शिंपल्या, चिंबोरी, किळशी, जिताडा, चिवणाी, बोईट, पालक, बाकस, ढोमा, कोळंबी, शिंगाला, हेकरू, वाकटी, मांदेली, शेवंड, तांब, पाला, पापलेट, बोंबील, बांगडा, घोल, रावस, कोळीम, खुबे, करपाली, भिलजी, करकरा, खडक खरबी, पाखट, शिवडा, मुशी, घोये, पोचे, इचार अशा विविध प्रकारची मासळी पकडून उदरनिर्वाह करीत.
मासळीच्या दुष्काळी परिस्थितीमुळे पारंपारिक पद्धतीने मासेमारी करणाऱ्या हजारो मच्छिमारांवर मागील काही वर्षापासून उपासमारीचे संकट येऊन ठाकले आहे. अशा आर्थिक कोंडीत सापडलेल्या पारंपारिक मच्छिमारांना नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी सातत्याने मच्छिमारांकडून केली जात आहे. त्यासाठी निदर्शने, मोर्चे, आंदोलनेही करण्यात आली आहेत. मात्र मच्छिमारांच्या मागणीकडे शासनाकडून जाणीवपूर्वक दुर्लक्षच केले जात असल्याचा मच्छिमारांचा आरोप आहे. भरावामुळे बुजली जाणारी मासळीची आश्रयस्थाने, वाढत्या सागरी प्रदूषणामुळे मासळीचा जाणवणारा दुष्काळ यामुळे नवी मुंबई परिसरातील पारंपारिक मच्छीमार पुरता संकटात सापडला आहे. (वार्ताहर)