पनवेलच्या स्वस्तिका घोषला शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार
By वैभव गायकर | Updated: April 18, 2025 19:15 IST2025-04-18T19:14:04+5:302025-04-18T19:15:24+5:30
स्वस्तिकाला मिळणारा पुरस्कार पनवेलकरांसाठी अभिमानाची बाब ठरली असून तिचे सर्व स्तरांतून अभिनंदन व कौतुक होत आहे.

पनवेलच्या स्वस्तिका घोषला शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार
लोकमत न्युज नेटवर्क, वैभव गायकर,पनवेल: महाराष्ट्रातील प्रतिष्ठित अशा शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्काराने टेबल टेनिसपटू स्वस्तिका घोष हिला सन्मानित करण्यात आले. बालेवाडी येथे राज्यपाल सी पी राधाकृष्ण यांच्या उपस्थितीत दि.18 रोजी झालेल्या सोहळ्यात राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते स्वस्तिकाला पुरस्कार प्रदान करण्यात आला. स्वस्तिकाला मिळणारा पुरस्कार पनवेलकरांसाठी अभिमानाची बाब ठरली असून तिचे सर्व स्तरांतून अभिनंदन व कौतुक होत आहे.
पुण्यातील बालेवाडी येथील शिवछत्रपती क्रीडा संकुलात राज्यपाल सी पी राधाकृष्ण यांच्या उपस्थितीत झालेल्या या समारंभास प्रमुख मान्यवर म्हणून राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,उपमुख्यमंत्री अजित पवार, उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील, विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे, क्रीडामंत्री दत्तात्रय भरणे, पणन व राज शिष्टाचार मंत्री जयकुमार रावल, आमदार उमा खापरे, आमदार अमित बोरखे, अप्पर मुख्य सचिव अनिल डिग्गीकर, क्रीडा आयुक्त हिरालाल सोनावणे आदींची उपस्थिती होती. आंतरराष्ट्रीय खेळाडू स्वस्तिका घोष ही जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या सीकेटी कॉलेजची विद्यार्थिनी आहे.
खारघर येथील रामशेठ ठाकूर पब्लिक स्कुलमध्ये स्वस्तिकाने इयत्ता तिसरी ते बारावीपर्यंत शिक्षण घेतले. त्यानंतर आता ती खांदा कॉलनी येथील सीकेटी महाविद्यालयात (स्वायत्त) बीएमएसचे शिक्षण घेत आहे. स्वस्तिकाने देशात व परदेशात झालेल्या टेबल टेनिस स्पर्धेत चमकदारी कामगिरी करीत देशाचे नाव उंचाविले आहे. गेल्या दहा वर्षांपासून ती महाराष्ट्र राज्याचे प्रतिनिधीत्व करीत आहे. खारघरच्या रामशेठ ठाकूर कॉलेजमध्ये ती दररोज सहा तास खेळाचा सराव करीत असते. स्वास्तिकाचे वडील संदीप घोष हे या खेळातील प्रशिक्षक आणि सल्लागार आहेत. टेबल टेनिससाठी माजी खासदार रामशेठ ठाकूर यांनी स्वस्तिकाला वेळोवेळी आर्थिक मदत करण्याबरोबरच प्रशिक्षणासाठी खारघर येथील विद्यालयात विशेष सोय केली आहे. स्वस्तिकाच्या या यशाचे संपूर्ण श्रेय जनार्दन शिक्षण प्रसारक संस्था,माजी खासदार रामशेठ ठाकूर यांना जात असल्याची प्रतिक्रिया संदीप घोष यांनी देत त्याबद्दल रामशेठ ठाकूर यांचे त्यांनी आभारही व्यक्त केले आहेत.