पुणे पूरग्रस्तांना पनवेल महापालिकेचा मदतीचा हात
By वैभव गायकर | Updated: July 27, 2024 18:41 IST2024-07-27T18:41:20+5:302024-07-27T18:41:48+5:30
कोणतेही आजार पसरू नये तसेच रोगांचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी पनवेल महानगरपालिका पुणे महानगरपालिकेच्या मदतीला धावली आहे.

पुणे पूरग्रस्तांना पनवेल महापालिकेचा मदतीचा हात
पनवेल : पुणे जिल्ह्यात सुरू असलेल्या अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर निर्माण झालेल्या पूरस्थितीमुळे पुणे शहर व आसपासच्या परिसरातील निवासी भाग, रस्ते व पूल, इतर अनेक ठिकाणी पाण्याच्या प्रवाहाबरोबर मोठ्या प्रमाणात गाळ, झाडे व कचरा वाहून आल्याने अस्वच्छता निर्माण झाली आहे. याठिकाणी कोणतेही आजार पसरू नये तसेच रोगांचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी पनवेल महानगरपालिका पुणे महानगरपालिकेच्या मदतीला धावली आहे.
पनवेल महापालिकेच्यावतीने पुणे मनपा ला पुरग्रस्त नागरिकांना मदतीसाठी आयुक्त मंगेश चितळे सर यांच्या निर्देशानुसार घन कचरा व आरोग्य विभागाच्यावतीने उपायुक्त डॉ. वैभव विधाते यांच्या मार्गदर्शनाखाली स्वच्छता पथक रवाना करण्यात आले आहे. पुणे येथे महापालिकेच्यावतीने खालीलप्रमाणे अधिकारी, कर्मचारी व साहित्य पाठविण्यात आले आहे. यामध्ये मनुष्यबळ व साधन सामुग्रीचा समावेश आहे.
पनवेल महानगरपालिकेतून मुख्य आरोग्य निरीक्षक, 6 स्वच्छता निरीक्षक,10 स्वच्छता पर्यवेक्षक ,30 फवारणी कर्मचारी असा एकूण 250 मनुष्यबळ पनवेल मध्ये रवाना झाला आहे. याव्यतिरिक्त मास्क, हँड ग्लोव्हज्, स्प्रे पंप, फॉगिंग मशीन तसेच एक हजार किलो जंतूनाशक पाउडर पनवेल महानगर पालिकेने पुणे महानगरपालिकेला पाठविले आहे.