अतिक्रमणांमुळे पनवेल-मुंब्रा महामार्ग आला धोक्यात 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 28, 2021 12:29 AM2021-02-28T00:29:19+5:302021-02-28T00:29:25+5:30

सिडको, रस्ते विकास महामंडळाचे दुर्लक्ष

The Panvel-Mumbra highway is in danger due to encroachments | अतिक्रमणांमुळे पनवेल-मुंब्रा महामार्ग आला धोक्यात 

अतिक्रमणांमुळे पनवेल-मुंब्रा महामार्ग आला धोक्यात 

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
कळंबोली : पनवेल-मुंब्रा महामार्गालगत मोठ्या प्रमाणात अनधिकृत गॅरेज, भंगार दुकाने, गोदामे आणि टायर दुकाने थाटण्यात आली आहेत. कळंबोली सर्कलपासून ते कल्याण फाट्यापर्यंत  या दुकानदारांकडून अतिक्रमण करण्यात आले आहे. महामार्गालगत अवजड  वाहनांच्या गॅरेजमुळे कित्येकदा आगी लागण्याच्या घटना घडल्या आहेत. तर जागा अडवल्यानेही मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागत आहे. याकडे सिडको, रस्ते विकास  महामंडळ आणि महापालिकेकडून दुर्लक्ष करण्यात येत आहे. 


पनवेल परिसरातून जाणाऱ्या महामार्गापैकी पनवेल-मुंब्रा महामार्ग हा महत्त्वाचा मानला जातो. या महामार्गावरून कल्याण, नाशिक, ठाणे, गुजरातकडे  जाण्याकरिता  या महामार्गाचा वापर केला जात आहे. त्याचबरोबर जेएनपीटी आणि कळंबोली लोह पोलाद मार्केटकडे मोठ्या प्रमाणात अवजड वाहने ये-जा करतात. कळंबोली सर्कल महामार्गालगत भंगार दुकाने,  पीओपी दुकान, टायर दुकाने, नर्सरी, मातीचे मडके, गोदाम, अवजड वाहनांच्या गॅरेजवाल्यांकडून अतिक्रमण करण्यात आले आहे. कळंबोली  रस्त्यालगच गॅरेज असल्याने वाहने दुरुस्तीसाठी रस्त्यावरच उभी करण्यात येत आहेत. त्यामुळे वाहतूक कोंडी होत आहे. कळंबोली गावालगतच अतिक्रमण करण्यात आल्याने या ठिकाणी रहदारीत वाढ झाली आहे. अनेकदा या ठिकाणी आगीच्या घटना घडल्या आहेत.  त्यामुळे बाजूला असलेले कळंबोली गाव असुरक्षित झाले आहे. गेल्या वर्षी  सिडकोकडून कळंबोली महामार्गालगतच्या  दुकानांवर हातोडा मारला होता. कोरोनाची टाळेबंदी उठल्यानंतर अतिक्रमणात भर पडली आहे. याकडे सिडको, रस्तेविकास महामंडळ, महापालिकेकडून दुर्लक्ष करण्यात येत आहे. 

रस्त्यालगत गोदामांची बांधकामे 
मुंब्रा महामार्गालगत तळोजापासून ते शिळफाट्यापर्यंत मोठ्या प्रमाणात गोदामे बांधण्यात आली आहेत. काहींनी जागा विकत घेऊन तिथे लहान लहान दुकाने  काढली आहेत. तर अनेकांनी अतिक्रमण करून गोदामाचे बांधकाम केले आहे. तेच गोदाम भाड्याने देण्यात येत आहे. या गोदामात भंगार व्यवसाय केला जातो. तर इतर वस्तू ठेवण्याकरता त्याचा वापर केला जात आहे. त्याचबरोबर धाब्यांसाठी महामार्गालगत माती टाकून अतिक्रमण केले आहे. 

Web Title: The Panvel-Mumbra highway is in danger due to encroachments

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.