पनवेलमध्ये शिक्षणाची धुरा एकाच्याच हाती
By Admin | Updated: April 8, 2016 01:49 IST2016-04-08T01:49:44+5:302016-04-08T01:49:44+5:30
पनवेलमध्ये खासगी शैक्षणिक संकुलांचे पेव फुटले आहे. त्यामुळे दिवसेंदिवस शुल्कवाढ, पालकांची आंदोलने, विद्यार्थ्यांची सुरक्षा, सरकारकडून लागू करण्यात आलेले उपक्रम

पनवेलमध्ये शिक्षणाची धुरा एकाच्याच हाती
प्रशांत शेडगे, पनवेल
पनवेलमध्ये खासगी शैक्षणिक संकुलांचे पेव फुटले आहे. त्यामुळे दिवसेंदिवस शुल्कवाढ, पालकांची आंदोलने, विद्यार्थ्यांची सुरक्षा, सरकारकडून लागू करण्यात आलेले उपक्रम आदी विषय चर्चेत असतात. त्यामुळे शिक्षण विभागावर कामाचा बोजाही वाढत चालला आहे. असे असतानाही तालुक्याचे गटशिक्षण अधिकारीपद रिक्त आहे. पाचपैकी दोन विस्तार अधिकारी कार्यरत असून एक रजेवर आहेत. त्यामुळे संपूर्ण तालुक्याची धुरा एकाच्याच खांद्यावर आहे. वारंवार प्रस्ताव पाठवूनही शासन पातळीवरील रिक्त पदे भरली जात नाहीत.
जिल्हा परिषदेच्या शाळांबरोबर खासगी शाळांचे प्रस्थ वाढत आहे. आजच्या घडीला लाखो विद्यार्थी या शाळांमधून शिक्षण घेतात. त्यामध्ये अनुदानित, विनाअनुदानित शाळांचा समावेश आहे. ही सगळी शैक्षणिक संकुले शिक्षण विभागाच्या नियंत्रणाखाली चालतात. यावर गट शिक्षण अधिकारी कार्यालयाच्या माध्यमातून सगळी देखरेख केली जाते. गेल्या एक-दीड वर्षापासून या विभागात नवनाथ साबळे हे अधिकारीच कार्यरत आहेत. त्यांच्याकडे एक वर्षापासून गटशिक्षण अधिकाऱ्याचा अतिरिक्त पदभार देण्यात आलाय.
शाळाबाह्य विद्यार्थी शोधण्याचे काम सर्वात आधी पनवेलमध्ये करण्यात आले. त्यामुळे आदई तलावाजवळील झोपडपट्टीतील आठ मुलांना शिक्षणाचे दालन खुले झाले. मात्र विस्तार अधिकारी नसल्याने या कामावर मर्यादा येत आहेत.